tomatoes  Pudhari File photo
नाशिक

Tomato Price Hike | लासलगावी टोमॅटोला भाववाढीची लाली

Nashik News : गामातील सर्वाधिक 1051 रुपये क्रेटने विक्री; शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

  • टोमॅटोला तब्बल 1,051 रुपये प्रति क्रेट इतका हंगामातील सर्वाधिक दर

  • लिलावात व्यापाऱ्यांची संख्या अधिक असल्याने स्पर्धात्मक वातावरण : शेतकऱ्यांना फायदा

  • येत्या काळात आवक आणि दर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता

लासलगाव (नाशिक) : कांद्याच्या बाजारपेठेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत सध्या टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली असून, शनिवारी (दि. २६) झालेल्या लिलावात टोमॅटोला तब्बल १०५१ रुपये प्रति क्रेट इतका हंगामातील सर्वाधिक दर मिळाला. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२१ जुलैपासून लासलगाव बाजार समितीत टोमॅटोचे लिलाव सुरू झाले असून, पहिल्या दिवशी २८३ क्रेट्सची आवक नोंदवण्यात आली होती. त्यावेळी सरासरी दर ६०० ते ७०० रुपये दरम्यान होता. दरम्यानच्या काळात आवक वाढत असताना दरही चांगले मिळत असल्याचे चित्र आहे.

लासलगावसह निफाड, चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि नेवासा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली आहे. त्यांच्या मालविक्रीसाठी लासलगाव बाजार समितीत गेल्या ३० वर्षांपासून टोमॅटो व डाळिंब लिलाव नियमितपणे आयोजित केले जात आहेत.

शनिवारी (दि.26) लिलावात व्यापाऱ्यांची संख्या अधिक असल्याने स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला. चांगल्या मालाला चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे चित्र असून, येत्या काळात आवक आणि दर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

टोमॅटो आवक आणि भाव
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चांगल्या प्रकारे टोमॅटोची आवक सुरू झालेली आहे. व्यापारी संख्या जास्त असल्याने स्पर्धा तयार होते व त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव या ठिकाणी मिळत आहे. सध्या १००० रुपयांच्या आसपास टोमॅटो उत्पादकांना भाव मिळत आहे. निफाड, येवला, चांदवड तालुक्यातून चांगल्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी येत आहे.
शैलेश भोर, टोमॅटो व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT