नाशिक : तंबाखूमुक्त शाळा अभियानाला गती देण्यासाठी नाशिक व पुणे विभागांतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन विभागीय बाल परिषदेच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत तंबाखू नियंत्रणाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. ग्रामीण भागातील शाळांच्या परिसरात तंबाखू विक्री, स्वच्छता तसेच तंबाखूमुक्त अभियानातील अडचणी व अनुभव विद्यार्थ्यांनी मांडले.
सलाम मुंबई फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित या परिषदेत शिक्षण, आरोग्य, प्रसार माध्यम आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. जिल्ह्यातील तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर प्रथमच अशा प्रकारे विभागीय स्तरावर बाल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात हा संदेश देत विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी चळवळ अधिक प्रभावी करण्याची शपथ घेतली.
भारत सरकारच्या तंबाखूमुक्त शाळांसाठी निर्धारित नऊ निकषांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमास सोलापूरचे शिक्षणाधिकारी कादर शेख, अधिव्याख्याते जितेंद्र साळुंखे, डॉ. जयश्री सरस्वत व मीडिया विभागाचे राजू ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गीता आहेर व पूर्वा म्हसणे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल जाधव यांनी आभार मानले. सलाम मुंबई फाउंडेशनचे अजय चव्हाण व गणेश कातकाडे यांच्या प्रयत्नांमुळे परिषद यशस्वी झाली.