नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रभाग क्रमांक १२ च्या यादीत भारताचे नागरिक नसलेल्या ५० तिबेटीयन निर्वासितांची नावे समाविष्ट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात प्रभागातील माजी नगरसेवकाने हरकत नोंदविल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, मतदार याद्यांवर हरकत दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीत बुधवार (दि.३) पर्यंत विक्रमी 9,827 हरकती दाखल झाल्या आहेत. यात सिडको विभागातील सर्वाधिक 6,717 हरकतींचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे समोर आले आहे. या याद्यांमध्ये हजारो दुबार नावे, मयत व्यक्तींच्या नावांचा समावेश असून एका प्रभागातील मतदार लगतच्या दुसऱ्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये टाकण्यात आल्याने या मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला. शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माकप या विरोधी पक्षां पाठोपाठ सत्ताधारी भाजप,शिवसेना शिंदे गटानेही या मतदार याद्यां विरोधात एल्गार पुकारला आहे. हरकतींचा आकडा वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाने हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबर पर्यत मुदतवाढ दिली होती. बुधवारी(दि.३) या मुदतीअखेर हरकतींचा आकडा ----वर गेला आहे. महापालिकेच्या आजवरच्वर निवडणूक इतिहासात प्रारूप मतदार याद्यांवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या आहेत.
हरकतींची पडताळणी सुरू
प्राप्त हरकतींची प्रत्यक्ष पडताळणीही प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. हरकतींच्या पडताळणीसाठी विभागनिहाय नोडल अधिकारी, पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यादी प्रमुख, यादी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन पडताळणी अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांना सादर केला जात आहे.
10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी
मतदार याद्यांबाबत त्रयस्थ हरकतींवर सुनावणी दिली जाणार आहे. मात्र मतदारांनी प्रत्यक्ष सादर केलेल्या हरकतींवर कुठलीही सुनावणी दिली जाणार नाही. या हरकतींची प्रत्यक्ष पडताळणी करून येत्या १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. दरम्यान, मतदार याद्यांबाबत गुरूवारी(दि.४) निवडणूक आयोगाने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मतदार याद्यांच्या सुधारीत कार्यक्रमावर चर्चा होणार आहे.
मतदार याद्यांवरील विभागनिहाय हरकती
विभाग हरकतींची आणि संख्या
मुख्यालय - 321
पंचवटी - 578
नाशिक पश्चिम - 102
नाशिक पूर्व - 637
सातपूर - 146
सिडको - 6,717
नाशिकरोड - 1,326
एकूण - 9,827
विधानसभेच्या यादीतच निर्वासितांची नावे
प्रभाग क्रमांक १२च्या मतदार यादीत यादी भाग क्रमांक एक मध्ये १७५/१ ते १७९/२मध्ये भारताचे नागरिक नसलेल्या व तिबेटीयन निर्वासित असलेल्या ५० व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आल्याची हरकत माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी नोंदविली आहे. विधानसभा निवडणुकीच्या यादीत या नावांचा समावेश असल्याने प्रभागाच्या यादीत ही नावे समाविष्ट झाल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअरच्या धोरणांनुसार तिबेटीयन नागरीक भारताचे नागरिक नाहीत.