नाशिक

Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

Nashik ZP to NASA | 'नाशिक ते नासा' उपक्रम : विद्यार्थ्यासोबत समन्वयासाठी तीन शिक्षकांची होणार निवड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या जगाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'नाशिक ते नासा' या अभिनव उपक्रमांतर्गत यंदा इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील नासा येथे शैक्षणिक अभ्यास भेट आयोजित करण्यात येणार आहे.

या शैक्षणिक दौर्यात विद्यार्थ्यासोबत समन्वय साधण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही अमेरिकेतील अभ्यास दौर्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शिक्षकांमधून तीन शिक्षकांची निवड केली जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून 'नाशिक ते नासा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील विज्ञान, अवकाश संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि भविष्यातील संशोधन क्षेत्रासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रवासात त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, यासाठी शिक्षकांचीही या दौर्यात समावेश करण्यात येणार आहे.
या दौर्यासाठी जि. प. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांमधून, शिक्षणसेवकाংসह तीन शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. निवड होणाऱ्या तीन शिक्षकांपैकी किमान एक महिला शिक्षिका असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षक जि. प. शाळेत कार्यरत असावा आणि परदेशातील या शैक्षणिक दौर्यासाठी स्वैच्छेने सहभागी होण्याची तसेच विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असावी.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यासोबत जि. प. शाळांतील शिक्षकांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग भविष्यात शाळांतील अध्यापन अधिक प्रभावी, प्रयोगशील आणि आधुनिक करण्यासाठी होऊ शकणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
— सरोज जगताप (प्राथमिक शिक्षणाधिकारी जि. प.)

हे आहेत निवडिचे निकष...

निवडीसाठी संबंधित शिक्षकाला/शिक्षिकेला इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे, संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता, वेळेचे व आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आणि अडचणीच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य असणे अपेक्षित आहे.

शिक्षकाचे वय कमाल ४५ वर्षे असावे. तसेच संबंधित शिक्षकाविरुद्ध कोणत्याही स्वरूपाची विभागीय किंवा खाते चौकशी सुरू अथवा प्रस्ताविते नसावी आणि कोणतीही पोलीस गुन्हा दाखल नसावा, असे निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निवड प्रक्रियेसाठी इच्छुक शिक्षकांनी आवश्यक माहिती ऑनलाइन भरायची आहे. माहिती भरण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर २०२६ निश्चित आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या माहितीचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT