Three thousand students took the 'Talent Search' exam
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दैनिक 'पुढारी' आणि आदिवासी एकात्मिक विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'पुढारी टॅलेंट सर्च' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत धुळे प्रकल्प विभागातील २१ शासकीय आश्रमशाळांमध्ये ३० सप्टेंबरला टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता चौथी ते सातवीच्या ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर 'पुढारी टॅलेंट सर्च' उपक्रमांची आखणी करण्यात आलेली आहे. परीक्षेमध्ये मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या चार विषयांवर आधारित बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते.
परीक्षेसाठी विद्यार्थांना ओएमआर शिट (उत्तरपत्रिका) देण्यात आल्या होत्या. नेहमीच्या परीक्षेपेक्षा वेगळी पद्धत असल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल दिसून आले. परीक्षेपूर्वी दैनिक 'पुढारी'तर्फे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला २५० पानांचे मार्गदर्शक पुस्तक तसेच सराव प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. तसेच निवडक शिक्षकांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली होती.
आश्रमशाळा मुख्याध्यापक शिक्षकांच्या देखरेखीखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडली. दैनिक 'पुढारी'चे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, व्यवस्थापक अशोक पाटील यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नेटके नियोजन केले होते. परीक्षा यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी भटू आव्हाड, चेतन महाले, शिक्षण विस्तार अधिकारी सतीश काकड, अविनाश पाटील, ज्योस्त्ना देवरे, 'न्यूबयो'चे जयेश रामोळे, तसेच दैनिक 'पुढारी'चे उपक्रम संयोजक राजेंद्र महाजन आदींनी प्रयत्न केले. परीक्षेदरम्यान आदिवासी प्रकल्पातील उच्चपदस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रियेचे अवलोकन केले.
दैनिक 'पुढारी'चा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यास आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सराव होऊन भविष्यात त्यांना राष्ट्रीय पातळीवर परीक्षांमध्ये सहज यश मिळविता येईल, अशा शब्दांत धुळे येथील प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.