Police Pudhari
नाशिक

Nashik Police | नाशिकमध्ये गणेशोत्सव बंदोबस्तात दांडी मारणाऱ्या 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई!

Nashik Police | जुना गंगापूर नाका परिसरातील चोपडा लॉन्स येथे रविवारी (दि. १३) रात्री ९ वाजता पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तावेळी पोलिस शिपाई अशोक वामन आघाव, तुषार दिलीप मंडले आणि महिला पोलिस शिपाई प्रतिभा गणेश गायधनी हे तिघेही गैरहजर आढळून आल्याने पोलिस आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जुना गंगापूर नाका परिसरातील चोपडा लॉन्स येथे रविवारी (दि. १३) रात्री ९ वाजता पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक नियंत्रणासह कायदा व सुव्यवस्थ राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत होमगार्डचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

जुना गंगापूर नाका परिसरातील चोपडा लॉन्स येथे गणेशमूर्ती विक्रीचे पाच स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, रविवारी रात्री पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीदरम्यान नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अशोक आघाव, तुषार मंडले आणि प्रतिभा गायधनी हे कर्तव्यावर उपस्थित नसल्याचे आढळून आले.

अशोक आघाव हे पोलिस मुख्यालयात, तुषार मंडले हे अभियोग कक्ष, तर प्रतिभा गायधनी यांची पोलिस मुख्यालयात नेमणूक आहे. गणेशोत्सवातील बंदोबस्त महत्त्वाचा असतानाही कर्तव्यावर गैरहजर राहिल्याची गंभीर दखल घेत तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT