सटाणा : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या सणाणिमित्त बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून मिठाई विक्रेत्याला दमदाटी करणाऱ्या तीन तोतयांना सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारजवळील राजस स्वीट्स या दुकानात हा प्रकार घडला. दुकानदाराच्या सतर्कतेमुळे तिघांचा बनाव उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत दुकानात प्रवेश केला. दुकानमालक रोहित सोनवणे यांच्याकडे विविध परवानग्या मागत दुकानातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून दमदाटी केली. मात्र, त्यांच्या बोलण्यावरून आणि देहबोलीवरून सोनवणे यांना संशय आला. त्यांनी तिघांकडे ओळखपत्रांची मागणी करताच त्यांची भंबेरी उडाली.
तिघांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांनी त्यांना रोखून धरत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी विश्वास शिवाजी उपाडे (रा. अंबड), भगवान कचरू आहिरे (रा. साautanनगर, नाशिक) आणि स्वप्निल उमेश बागूल (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.