Death Pudhari
नाशिक

Bus Accident Case | बागलाणमधील तीन भाविक जयपूरजवळ अपघातात ठार

Bus Accident Case | जळत्या कंटेनरला खाजगी बसची धडक : जखमी सात जणांत तीन बालकांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक/नामपूर : पुढारी वृत्तसेवा
राजस्थान येथे कुलदैवताच्या दर्शनाला गेलेल्या बागलाण तालुक्यातील भाविकांच्या खाजगी बसची धडक जळत्या कंटेनरला बसल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात अजमीर सौंदाणे येथील मगर कुटुंबातील तीन जण ठार झाल्याची घटना घडली. यात सात जण जखमी असून, नऊ ते दहा महिन्यांच्या तीन बालकांचाही समावेश जखमींमध्ये आहे.

अजमीर - जयपूर मार्गावरील जयपूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील मगर कुटुंबीय सोमवार (दि. १९) पासून राजस्थानच्या यात्रेला गेले होते. शनिवारी (दि. २४) पहाटे खाटूश्याम येथून दर्शन आटोपून सालासरकडे जात असताना, ते जात असलेल्या बसने जयपूरजवळ आग लागलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली.

मगर कुटुंबातील संदीप रामसिंग मगर (५०), दीपक त्र्यंबक मगर (६५) आणि महेश विजयसिंग मगर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील इतर सात भाविक जखमी झाले आहेत. मृत तिघे चुलतभाऊ असल्याचे समजते. जखमी व मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वांना गावी आणण्यासाठी राजस्थानमधील करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था केल्याची माहिती आहे.

रविवारी (दि. २५) पहाटेपर्यंत मृतदेह व जखमींचे वाहन अजमीर सौंदाणे येथे पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रवींद्र पवार यांनी दिली. दरम्यान, अपघातांनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली. चालकाच्या पलायनामुळे अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चालक हा बागलाण तालुक्यातील मेंढीपाडा येथे वास्तव्यास असून, त्याचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील साक्री असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याकडून विचारपूस

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत जखमींना तत्काळ मदत मिळवून देण्याची विनंती केली. त्यानंतर राज्यपाल बागडे यांनी लगेच रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस करीत उपचाराबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT