मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहर व परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीपिके, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्जन्यवृष्टीसाठी रविवारी (दि. २७) शहरातील पोलिस कवायत मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज-ए-इस्तिस्का अदा केली. त्यानंतर पाऊस पडावा, शेतीपिकांना जीवनदान मिळावे, पाणीटंचाई दूर व्हावी आणि सर्वांचे कल्याण व्हावे, यासाठी अल्लाहकडे सामूहिक दुआ करण्यात आली.
कडक उन्हाची तमा न बाळगता, शहराच्या विविध भागांतून मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर हजारांच्या संख्येने दाखल झाले होते. मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर पर्जन्यवृष्टीसाठी भावपूर्ण दुआ करण्यात आली.
'आमच्या चुका माफ कर आणि जमिनीवर पावसाची नेमत अता फरमा', अशा आशयाची प्रार्थना यावेळी करण्यात आली. पावसाअभावी निसर्गचक्रावर परिणाम होत असून, शेतीपिकांची वाढ खुंटली आहे. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाऊस पडावा, अशी विनवणी करण्यात आली.
शहर व परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी चिंतेत असून, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीसाठ्यांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकडून आयोजित या सामूहिक प्रार्थनेला मोठा प्रतिसाद मिळाला. नमाज व दुवादरम्यान ईदगाह मैदानावर भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
चांगल्या आचरणाचे आवाहन:
नमाज-ए-इस्तिस्काचे महत्त्व स्पष्ट करताना, प्रत्येकाने आपल्या आचरणाचे आत्मपरीक्षण करावे, चुका झाल्या असल्यास तौबा करून अल्लाहकडे माफी मागावी, असे आवाहन केले. नागरिकांनी परस्परांशी चांगले व्यवहार ठेवावेत, वाईट बोलणे टाळावे, व्यसनांपासून दूर राहावे आणि आचरणात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन मौलाना मुफ्ती यांनी यावेळी केले.