नाशिक : कोणतीही वैद्यकीय पदवी (डिग्री) नाही, की शासनाचा अधिकृत परवाना (लायसेन्स) नाही... तरीही क्लिनिक थाटून थेट रुग्णांच्या जिवाशीच खेळ मांडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या धडक कारवायांमध्ये तब्बल ३२ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला असून, या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात सर्वाधिक इगतपुरी तालुक्यातील १९ डॉक्टरांचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस वैहाकीय व्यावसायिकांना चाप बसला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांमध्ये परप्रांतीय, विशेषतः कथित 'बंगाली डॉक्टरांचा' मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील अज्ञानाचा फायदा घेत या बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली होती. हे बोगस डॉक्टर प्रामुख्याने हातावर पोट असणारे मजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि दुर्गम भागांतील गरीब रुग्णांना आपले लक्ष्य बनवतात.
कमी खर्चात आणि झटपट गुण येईल, असे खोटे आमिष हे रुग्णांना दाखवायचे. आजार कोणताही असो, रुग्णाला तात्पुरता आराम वाटावा म्हणून हे भोंदू डॉक्टर हाय डोस अँटिबायोटिक्स आणि आरोग्याला घातक ठरतील अशी तीव्र वेदनाशामक औषधे व सुया टोचत असल्याचे छाप्यात उघड झाले आहे. यामुळे रुग्णांच्या किडनी आणि यकृतावर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला होता.
जिल्हा आरोग्याधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने वेळोवेळी गोपनीय माहितीच्या आधारे तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारावर ग्रामीण भागातील संशयास्पद दवाखान्यांवर छापे टाकले. या छाप्यात वैद्यकीय उपकरणांचा साठा, कोणतीही वैध कागदपत्रे नसलेली औषधे जप्त करण्यात आली आहेत. पकडण्यात आलेल्या सर्व ३२ जणांवर 'महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम' कायद्यांतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांविरुद्ध अत्यंत कडक मोहीम उघडलेली आहे. बोगस अथवा संशयास्पद डॉक्टर आढळल्यास आरोग्य विभागाकडून तत्काळ दखल घेतली जाते. तसेच ग्रामीण भागातील वेळोवेळी प्राप्त झालेल्या तक्रारींवर आरोग्य विभाग अॅक्शन घेऊन, कारवाई करत आहे. त्यांच्या धडक आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे प्रशासनाने पाच वर्षांत तब्बल ३२ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जबाबदारी ग्रामपंचायतीचीही !
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे पेव फुटण्यामागे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे. गावागावांत सुरू असलेल्या अशा अनधिकृत क्लिनिकवर लक्ष ठेवण्याची पहिली जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. आपल्या हद्दीत प्रक्टिस करणाऱ्या या डॉक्टरांची पदवी आणि परवान्याची पडताळणी ग्रामपंचायतीने करणे बंधनकारक आहे.
बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी तालुकास्तरावर मोहीम राबविण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांच्या पथकावर तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची मदत घेणार आहे. बोगस डॉक्टर आढळल्यास तत्काळ कळवावे. - डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद
वैद्यकीय क्षेत्रात बनावट पदव्यांच्या जोरावर रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागरिकांची आरोग्यविषयक फसवणूक टाळण्यासाठी परिषदेने 'नो युअर डॉक्टर' ही क्यूआर कोड आधारित अत्याधुनिक डिजिटल प्रणाली राज्यात कार्यान्वित केली आहे.
या तंत्रज्ञानामुळे आता केवळ एक 'स्कॅन' करून रुग्णांना संबंधित डॉक्टरांची संपूर्ण सत्यता आणि वैद्यकीय पार्श्वभूमी जागेवरच तपासता येणार आहे. गेल्या काही काळापासून बनावट पदव्या आणि प्रमाणपत्रांच्या आधारे प्रक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे प्रमाण याढले आहे. अशा घटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत होते. या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय परिषदेचा हा डिजिटल पुढाकार गेमचेंजर ठरणार आहे.
प्रत्येक अधिकृत आणि नोंदणीकृत डॉक्टरसाठी हा क्यूआर कोड आता बंधनकारक केला आहे. यामुळे खरे आणि खोटे डॉक्टर यांच्यातील फरक सामान्य जनतेलाही अगदी सहजपणे ओळखता येईल. या प्रणालीमुळे केवळ बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाला चाप बसणार नाही, तर सर्वसामान्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांमध्ये निर्माण होणारी ही तांत्रिक जागृतीच आता फसवणूक करणाऱ्या घटकांविरुद्ध सर्वात मोठे हत्यार ठरणार आहे.
नो युअर डॉक्टर' प्रणाली लागू
महाराष्ट्र वैहाकीय परिषदेने अधिकृत नोंदणीकृत डॉक्टरांसाठी 'नो युअर डॉक्टर ही विशेष प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला एक युनिक क्यूआर कोड प्रदान केला जात आहे. हा क्यूआर कोड डॉक्टरांना त्यांच्या विलनिक किया हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असणार आहे. यामुळे दवाखान्यात येणारा कोणताही रुग्ण आपल्या मोबाइलद्वारे डॉक्टरांची पडताळणी अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकणार आहे.