नाशिक : श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवार (दि. 11) निमित्त शिवभक्तांमध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रविवारी (दि. 10) रात्री अनेक जथ्थे पायी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणार आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांचा प्रवास विनासायास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे नाशिकहून 270 जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून दर पाच मिनिटांनी त्र्यंबकेश्वरसाठी बस सोडण्यात येणार आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला तिसर्या श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविक प्रदक्षिणा मारणार आहेत. 12 ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणात ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारण्याची पुरातन परंपरा आहे. प्रतिवर्षी श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळाच्या नाशिक विभागाने यंदा सोमवारी (दि.11) 270 अधिक बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे यासह नियमित 160 फेर्याही पूर्वनियोजनानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जुना सीबीएस ते टिळकवाडी सिग्नल हा रस्ता सोमवारी (दि. 11) दीड दिवस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
नाशिकमध्येही कपालेश्वर, सोमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कपालेश्वर मंदिरात स्त्री - पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली असून मंदिराच्या चारही बाजूने आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात येणार आहेत. मंदिरात पहाटे रुद्राभिषेक, धार्मिक अनुष्ठान, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
श्रावणी सोमवारी नाशिकसह शेजारील जिल्ह्यातून शेकडो कवडधारक विविध भागांतील नद्यांचे जल कावडमध्ये भरून भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी कपालेश्वर त्र्यंबकेश्वर या दोन्ही तीर्थक्षेत्रांवर येत असतात. यंदाही कवडधारकांचा उत्साह असून या दोन्ही ठिकाणांवर उपस्थित राहणार असल्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यात आले आहे.