नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी भागातील (पेसा) शिक्षक भरतीचा तिढा सुटत नाही तोच आता या प्रक्रियेला नव्या वादाचे ग्रहण लागले आहे. आधीपासून आमनेसामने आलेल्या दोन गटांनंतर आता तिसऱ्या गटाने या संघर्षात उडी घेतली असून, सरसकट भरती प्रक्रियेला थेट आव्हान दिले आहे.
केवळ गुणवत्तेच्या आधारावरच शिक्षकांची नियुक्ती केली जावी आणि मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना परस्पर सेवेत कायम करू नये, असा पवित्रा या गटाने घेतला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना निवेदनाद्वारे भरतीला विरोध दर्शविला आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामन खोसकर व नितीन पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन तोडगा काढला होता. यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७ जुलै २०२६ रोजी मानधनावरील ३०८ शिक्षक आणि गुणवत्तेनुसार ३११ शिक्षकांची भरती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रक्रियेत मानधन तत्त्वावरील अपात्र शिक्षकांना सामावून घेण्यास आता तीव्र विरोध होत आहे.
पात्र शिक्षकांनी दिलेल्या निवेदनानुसार, गुणवत्तेवर आधारित ३११ शिक्षकांच्या नियुक्तीला कोणताही विरोध नाही. मात्र, मानधनावरील शिक्षकांना सरसकट कायम केल्यास संचमान्यतेनुसार रिक्त जागांचे प्रमाण शून्य होईल. परिणामी, 'पवित्र पोर्टल' भरतीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडे एकही जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे गुणवत्तेलाच प्राधान्य देऊन भरती करावी, अन्यथा शिक्षण आयुक्तांकडे दाद मागू, असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.
"शिक्षक भरतीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. गुणवत्तेनुसार मानधन तत्त्वावरील शिक्षकांचा समावेश असेल."— साईलता सामलेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प.