नाशिक

साक्री तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट व डिझेल चोरीला

गणेश सोनवणे

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट व डिझेल चोरी झाल्याची घटना घडली आहे. सदर ट्रॅक्टर जप्त करुन या ठिकाणी उभी केलेली होती. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाने आता तहसीलदारांकडेच भरपाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालयापासून काही अंतरावरच पोलीस ठाणे आहे. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचेच यातून दिसत आहे.

साक्री तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 12 डिसेंबर 2023 रोजी गोडावूनजवळ जप्त केलेले ट्रॅक्टर उभे केलेले होते. या ट्रॅक्टरचे डिझेल, डांबर, ट्रॅक्टरचे हॅण्डल चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. ही बाब लक्षात आल्याने ट्रॅक्टरचे मालक तथा शेतकरी निलेश शांताराम देसले, रा. कासारे यांनी तहसीलदारांकडे तक्रार अर्ज करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शिवाय त्यांनी पोलीस ठाणे व जिल्हा कार्यालयातही तक्रार अर्ज दिला. यावेळी साक्री तालुक्याचे मनसेचे नेते धीरज देसले यांनी साक्रीचे प्रांताधिकारी रवींद्र शेळके यांच्याशी चर्चा करून संबंधित चोरीचा विषय मांडला. शासकीय कार्यालयाच्या आवारातून वाहनाच्या साहित्याची चोरी होत असेल तर जबाबदारी कोणाची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, शासकीय आवारही आता सुरक्षित नसल्याने सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT