नाशिक : बालरंगभूमी परिषद नाशिक शाखा व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालरंगभूमी दिन शनिवारी(दि.२) उत्साहात साजरा झाला. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोग, नाटुकली, पोवाडा, देशभक्तीपर गीते आदी कलेला उपस्थितांनी दाद दिली.
बालकांचा हक्काचा दिवस या संकल्पनेतून मराठी बालनाट्य दिवस सोहळा उदयास आला आणि येथील बालकलाकारांनी या सोहळ्या इंद्रधनुच्या रंगाचा साज चढवला. देशातील दुसरा आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा दिन साजरा झाला. कार्यक्रमात 'माझ्या पप्पांनी गणपती आणला', 'डम डम डमरू वाजे' या गाण्यांवर नृत्य करून लहानग्यांनी उपस्थिततांची मने जिंकली. कुणी पाणीटंचाई, मुक्ताबाई यांसारख्या विषयांवर एकपात्री अभिनय केला तर काहींनी देशभक्तीपर गाणी, काही पोवाडे आणि छोटे नाटुकले सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
बाल रंगभूमीतर्फे या बालकलाकारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. आदिती मोराणकर, उपाध्यक्ष जयदीप पवार, ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक संस्थेचे संचालक गोपाळ पाटील, राजेश भुसारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांचे सहकार्य लाभले.