नाशिक : मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करताना जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे, सुनील गवादे. समवेत नरेडको नाशिक शाखेचे पदाधिकारी.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Homethon : ‘होमेथॉन’मधून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश

मंत्री गिरीश महाजन : हरित नाशिकच्या दिशेने ठोस पावले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक धोरणे अत्यंत महत्त्वाची असून, ‘हरित नाशिक’ ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले. नरेडको आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-२०२५’ ला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

मंत्री महाजन म्हणाले, होमेथॉनमध्ये प्रत्येकवेळी नवीन आणि सकारात्मक उपक्रम पाहायला मिळतात. प्रदर्शनातून हरित नाशिक या संकल्पनेचे ब्रँडिंग प्रभावीपणे करण्यात आले आहे. प्रदर्शनाला जेवढे ग्राहक भेट देतील, तेवढीच झाडे नाशिक शहरात विकासकांच्या ले-आउटमध्ये लावण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे. पर्यावरण संवर्धन आणि विकासाचा समतोल साधण्याचा हा उत्तम प्रयत्न आहे. नाशिकमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. हवामान, धार्मिक वातावरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शांतता यामुळे नाशिक निवृत्तीनंतर वास्तव्यासाठीही आदर्श शहर बनले आहे. त्यामुळेच घर खरेदीसाठी नागरिकांचा ओढा नाशिककडे वाढत आहे. पूर्वीचे नाशिक आणि आजचे नाशिक यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. या बदलाचे श्रेय येथील विकासकांना जात असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.

होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर म्हणाले, कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनात नरेडको सक्रिय सहभाग घेणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात विकासकांकडे जे फ्लॅट्स उपलब्ध असतील, ते भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. विकासकांच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा शाही स्नानांवेळी पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासनही ठक्कर यांनी दिले. सामाजिक बांधिलकी जपत काही समाजसेवी संस्थांना मोफत स्टॉल देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्री महाजन यांचे स्वागत जयेश ठक्कर, नरेडकोचे सचिव शंतनू देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, माजी आमदार बाळासाहेब सानप, सुनील बागुल, विजय साने, महेश हिरे, मुन्ना हिरे, सागर वैद्य, सुधाकर बडगुजर, हिमगौरी आडके, नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे उपस्थित होते.

नाशिककर पूर्णपणे समाधानी होईपर्यंत वृक्षारोपण करणार

आंध्रप्रदेशातून १५ हजार मोठी रोपे नाशिकमध्ये आणली आहे. शहरातील विविध भागांत दररोज वृक्षारोपण सुरू आहे. हा आकडा केवळ १५ हजारांपुरता मर्यादित न राहता भविष्यात २० हजार, ४० हजार, ५० हजारांपर्यंत नेण्याचा मानस आहे. जोपर्यंत नाशिककर पूर्णपणे समाधानी होत नाहीत, तोपर्यंत वृक्षारोपणाचा हा उपक्रम सुरूच राहील, असेही मंत्री महाजन म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT