दोन्ही भावंडांनी एकत्र यावे, यासाठी राज्यभरातून गळ घातली जात आहे  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Thackeray Brand : शक्तीप्रदर्शनातून ‘ठाकरे ब्रॅण्ड’ वर मनोमिलनासाठी दबाव

नेत्यांकडून युतीचे प्रबळ संकेत : कार्यकर्त्यांच्या नजरा दसरा मेळाव्याकडे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतिश डोंगरे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘ठाकरे ब्रॅण्ड’ निर्णायक ठरू शकतो, अशी कार्यकर्त्यांची ठाम धारणा आहे. त्यामुळे दोन्ही भावंडांनी एकत्र यावे, यासाठी राज्यभरातून गळ घातली जात आहे. नाशिकमध्ये शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली मनोमिलन बैठकांची मालिका आणि शुक्रवारी (दि. १२) काढलेल्या संयुक्त जनआक्रोश मोर्चामुळे या उभय पक्ष आणखीनच समीप आले आहेत. या मोर्चातून वरिष्ठ नेत्यांनी युतीचे प्रबळ संकेत दिल्याने, कार्यकर्त्यांमध्ये आता ‘ठाकरे ब्रॅण्ड’ची एकच चर्चा रंगत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन बंधुंनी एकत्र येण्याच्यादृष्टीने एकमेकांना सकारात्मक टाळी दिली असून, त्यांच्या वारंवार होत असलेल्या भेटीगाठी युतीच्या चर्चांना बळ देत आहेत. शिवतीर्थावर होणाऱ्या आगामी दसरा मेळाव्यात जर दोन्ही बंधु एकाच मंचावर आले तर, युतीवर शिक्कामोर्तब होईल, असाही तर्क लावला जात आहे. युतीची घोषणा सर्वस्वीपणे ठाकरे बंधुंवर अवलंबून असली तरी, पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये मात्र युतीचा ‘फिव्हर’ वाढतच आहे. विशेषत: नाशिकमध्ये युतीसाठी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उत्सुक असून, मागील काही दिवसांपासून त्यांच्यातील ताळमेळ युतीसाठी अनुकुलता दर्शवित आहे. संयुक्त जनआक्रोश मोर्चानिमित्त गेल्या महिनाभरापासून दोन्ही सेनेचे पदाधिकारी खांद्याला खांदा लावून जनतेच्या प्रश्नांवर काम करीत आहेत. अंतर्गत हेवेदावे बाजुला ठेऊन ही मंडळी एकदिलाने कामाला लागल्याने, कार्यकर्त्यांमध्येही हुरूप वाढला आहे.

त्यातच दोन्ही पक्षांचे बडे नेते, संभाव्य युतीचे स्पष्ट संकेत देत असल्याने, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून युती डोळ्यासमोर ठेऊनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित जुळवायला सुरुवातही केली आहे. जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ही बाब दर्शवून दिली असून, पक्षाच्या प्रमुखांवर एकप्रकारे युतीसाठी दबाव निर्माण केल्याचेच चित्र दिसून येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीपासून तुर्त अंतर

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे सेनेकडून आगामी निवडणुका मविआसोबतच लढणार असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दूरच ठेवल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाची मनसेशी जवळीक वाढत असताना, मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाेबत अंतर वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ‘मविआ’चे भवितव्य तुर्तास अंधातरी दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT