Tejas Mk One Fighter Jet Launch Nashik :
भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आज नाशिकमध्ये अनुभवण्यास मिळणार आहे. पहिलं स्वदेशी बनावटीचं 'तेजस एमके वन' हे लढाऊ विमान आज नाशिकमधून आकाशात झेपावणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या तळावर हा थरार अनुभवता येणार आहे. एचएएलमध्ये तेजस विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचं लोकार्पणही संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल.
तेजसचा हा प्रवास केवळ एका विमानाचा नसून, तो भारताच्या सामर्थ्याचा आणि आत्मनिर्भरतेकडे टाकलेल्या भक्कम पावलांचा आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वीच याची यशस्वी चाचणी पार पडली होती. आता, आजच्या दिवशी हा सोहळा पार पडत असून, या दिवसापासून भारतीय बनावटीचं तेजस हे भारताच्या वायुदलामध्ये दाखल होईल. भारतीय वायुदलाची नवी ताकद म्हणून या लढाऊ विमानाकडे पाहिलं जाणार आहे.
देशभरातील संरक्षण क्षेत्राचं या सोहळ्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. यानिमित्ताने नाशिकच्या ओझर येथील एचएएल तळावर जोरदार तयारी करण्यात आली आहे.