वाडिव-हे: शिक्षिकेच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेताना उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, सहायक पोलिस निरीक्षक धीरज महाजन व पोलिस पथक 
नाशिक

Teacher killed Case Solved | प्रेमसंबंध, लग्नाच्या आमिषातून शिक्षिकेची हत्या

वाडिव हे पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडला; चार आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : तालुक्यातील एसएमबीटी मेडिकल कॉलेजजवळ शिक्षिका व एलआयसी एजंट संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येप्रकरणी वाडिव हे पोलिसांनी चार आरोपींना अटक करीत गुन्ह्याचा छडा लावला. प्रेमसंबंध, मालमत्तेचा मोह आणि लग्नाच्या आमिषातून हा खून करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धीरज महाजन व त्यांच्या पथकाने तपास करीत मुख्य आरोपी दिगंबर भागुजी आव्हाड याच्यासह संतोष जाधव, तुषार रत्नपारखी व विनोद पांडे यांना अटक केली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत संगीता चंदनशिवे या कल्याण येथील मोहने परिसरात राहात होत्या. त्या वेणूबाई आंबो पावसे विद्यालयात पूर्णवेळ शिक्षिका होत्या. त्या एलआयसी एजंट म्हणूनही कार्यरत होत्या. दि. १४ जुलै २०२६ रोजी घरातून बाहेर पडल्यानंतर त्या परत आल्या नसल्यामुळे त्यांच्या भावाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दि. १६ जुलै रोजी एसएमबीटी मेडिकल कॉलेज प्रवेशद्वाराजवळील पार्किंगमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. आधारकार्डाच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली.

तपासादरम्यान पोलिसांनी मोबाइलच्या कॉल डिटेल रेकॉर्डची छाननी केली असता, शेवटचे संभाषण संतोष जाधवशी झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चौकशीत दिगंबर आव्हाड, तुषार रत्नपारखी व विनोद पांडे यांच्या सहभागाची माहिती समोर आली.

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक धीरज महाजन, उपनिरिक्षक कुशारे, गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार विकास गिते, विनोद गोसावी, शिरीष गांगर्डे, रामकृष्ण लहामटे, विशाल सोनवणे यांनी आरोपींना अटक केली. पोलिस तपासात दिगंबर आव्हाड आणि संगीता चंदनशिवे यांच्यात २००४ पासून प्रेमसंबंध होते. दरम्यान आव्हाडने दुसऱ्या महिलेशी विवाह केला.

मात्र संगीता लग्नासाठी सातत्याने आग्रह करत होत्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने संगीता यांच्या नावावरील तीन फ्लॅट स्वतःच्या नावावर करण्याची किंवा मृत्युपत्र करून देण्याची अट घालत काही कागदपत्रे, कोऱ्या कागदांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या.

लग्नाच्या बहाण्याने नेले, केली पार्किंगमध्ये हत्या

दि. १५ जुलै रोजी मंदिरात लग्न करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी संगीता यांना भाड्याच्या कारने आसनगावहून बाहेर नेले होते. सिन्नर एमआयडीसीमार्गे नाशिककडे आणून जेवणानंतर दोन आरोपींना उतरवून मुख्य आरोपी दिगंबर आव्हाड, चालक तुषार रत्नपारखी आणि संगीता चंदनशिवे हे एसएमबीटी मेडिकल कॉलेजकडे आले. मेडिकल कॉलेजबाहेरील पार्किंगमध्ये वाहन उभे करून चालकाला चहा आणण्यासाठी पाठविले. त्याच वेळी लग्नाच्या विषयावर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर दिगंबर आव्हाडने मारहाण करून कपड्याने तोंड दाबत संगीता चंदनशिवे यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. वाडिव हे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT