TCS Nashik Case Pudhari
नाशिक

TCS Nashik Harassment | "मूल हवे असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव"; नाशिक टीसीएस प्रकरणात नराधम आरोपीचा धक्कादायक खुलासा

TCS Nashik Harassment | महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात हा नवा खुलासा समोर आल्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'तुला मूल हवे असेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव', अशी संतापजनक व अमानुष टिप्पणी करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप टीसीएस नाशिकमधील कर्मचाऱ्याने केला आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात हा नवा खुलासा समोर आल्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींविरोधात ९ महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप करत गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जबरदस्ती धर्मांतर झाल्याचा दावा करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यानेही धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार, त्याला टीम लीडर्सकडून नमाज पढण्यास, कलमापठण करण्यास तसेच डोक्यावर टोपी घालण्यास भाग पाडले जात होते. या सर्व प्रकारामुळे त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला होता. याच काळात आरोपींपैकी एकाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याची खिल्ली उडवत, वंध्यत्वावरून टोमणे मारले होते.

'तुला मूल हवे असेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठव', असे वक्तव्य करत त्याला अपमानित करण्यात आले, असा गंभीर आरोप त्याने केला आहे. या वक्तव्यामुळे या प्रकरणातील छळाचे स्वरूप किती घृणास्पद होते, हे स्पष्ट होत आहे.

अशाच अनेक बाबी या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत उघडकीस आल्या आहेत. यात महिलांची तस्करी, त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर यांसह त्यांची आर्थिक फसवणूकही करण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे या सर्व पीडित महिला कर्मचाऱ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अतिशय सर्वसामान्य आहे.

त्यामुळे यांना टार्गेट करणे कंपनीतील अधिकाऱ्यांना सोपे जात होते. सुरुवातीला विविध आमिष दाखवले गेले. त्याचबरोबर जे ऐकत नाही, त्यांना कामाच्या माध्यमातून त्रास द्यायला सुरुवात करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत असून, आणखी काही महत्त्वाचे पुरावे व माहिती समोर येण्याची शक्यता आहे. कार्यस्थळी महिलांची सुरक्षितता तसेच कर्मचाऱ्यांवरील मानसिक आणि धार्मिक दबाव या मुद्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT