नाशिक

Tata Technologies Nashik | नाशिक-पुण्यात 'टाटा टेक्नॉलॉजी'ची 4,800 कोटींची गुंतवणूक

Tata Technologies Nashik |'एसीई गॅसेस टेक्नॉलॉजी'ची दिंडोरीत 750 कोटींची गुंतवणूक जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवसांपूर्वीच 'एबीबी इंडिया'ने नाशिकमध्ये २०० कोटींच्या विस्तार गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर टाटा टेक्नॉलॉजीसह एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीकडून नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

टाटा टेक्नॉलॉजीकडून एरोस्पेस व संरक्षणसंबंधित उत्पादनांसाठी नाशिकसह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ४,८०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. एसीई गॅसेस टेक्नॉलॉजी प्रा. लि. कडून दिंडोरीत ७५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.११) विधान भवनात आठ मोठ्या कंपन्यांसोबत ४४ हजार ७१० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली, फायबर उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे. यातून सात हजार रोजगारनिर्मिती होईल. टाटा टेक्नॉलॉजीजकडून नाशिकसह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ४,८०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या या गुंतवणुकीमुळे नाशिकच्या 'डिफेन्स हब' आणि 'इनोव्हेशन सेंटर' उभारणीला मोठे बळ मिळणार आहे. याशिवाय नागपूर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरसह नाशिकचा समावेश असलेल्या डिफेन्स क्लस्टरला या गुंतवणुकीमुळे चालना मिळण्याची शक्यता आहे.

एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीकडून दिंडोरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे येथे द्रव वैद्यकीय ऑक्सिजन आणि औद्योगिक वायू उत्पादनासाठी ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने उद्योग विभागाला मार्च २०२६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार, या प्रकल्पातून दररोज ३०० टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

कंपनीकडून पहिल्या टप्प्यात ५०० कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. जुलै २०२४ मध्ये आंध्र प्रदेशात स्थापन झालेल्या या कंपनीने अल्पावधीतच नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक जाहीर केल्याने, या प्रकल्पातून कंपनी व्यवस्थापनास मोठ्या अपेक्षा आहेत.

दिंडोरी बनतेय 'फार्मा हब'

दिंडोरीतील अक्राळे येथे रिलायन्सची उपकंपनी असलेल्या रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रा. लि.ने मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीकडून या प्रकल्पातून जीवनरक्षक औषधे उत्पादन संशोधन केले जाणार आहे. रिलायन्सच्या या गुंतवणुकीनंतर एसीई गॅसेस टेक्नॉलॉजी प्रा. लि. ने गुंतवणूक जाहीर केली. या कंपनीकडून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. दोन मोठे प्रकल्प दिंडोरीत आल्याने दिंडोरीच्या वसाहतीचा प्रवास 'फार्मा हब'च्या दिशेने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT