नाशिक : सतीश डोंगरे
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतरही नाशिकहून अमेरिकेत निर्यातीचा ओघ सुरूच आहे. २०२४- २५ या आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार ४०३.३६ कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल ७.७४ टक्के इतकी निर्यातीत वाढ झाली आहे. पाठोपाठ युएई, बांगलादेश, नेदरलॅण्ड, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, मलेशिया या देशांचा समावेश आहे.
केंद्रीय उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वाणिज्य शोध व सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीतून जिल्ह्याच्या निर्यातीची सद्यस्थिती समोर आली आहे. गेल्या १ आॅगस्ट २०२५ रोजी अमेरिकेने भारतावर प्रारंभी २५ टक्के आणि त्यानंतर पुन्हा २५ टक्के असा ५० टक्के टॅरिफ लावल्याने, त्याचा निर्यातीवर परिणाम होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, प्रत्यक्षात निर्यातीत ७.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधे, वाहनांचे सुटे भाग, बेअरिंग, तेल व गॅससाठीचे लोखंडी पाइप, एसी जनरेटर्स या उत्पादनांची मोठी निर्यात केली जात आहे. जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या देशांत दुसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात असून, तेथे जिल्ह्यातून तब्बल २,८१८ कोटींची निर्यात करण्यात आली आहे. त्यात कांदा, ऊस, द्राक्षे, व्हिस्की, बोर्ड, पॅनल्स, हिरवी मिरची, गहू, स्मार्टफोन, दोरखंड या उत्पादनांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ बांगलादेश, नेदरलॅण्ड, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, मलेशिया, सौदी अरब, रशिया या देशात सर्वाधिक निर्यात झाली आहे.
या उत्पादनांची निर्यात
अमेरिका - औषधे, वाहनांचे सुटे भाग, लोखंडी पाइप
यूएई, बांगलादेश, मालेशिया - कांदा, ऊस, द्राक्षे, हिरवी मिरची, गहू, व्हिस्की
जर्मनी, नेदरलॅण्ड, दक्षिण आफ्रिका - कॅपेसिटर्स, फ्युअल इंजेक्शन, बॉल बेअरिंग, ओषधे
इंग्लंड - द्राक्ष, मका, सोयाबीन, मोटारकार सिलिंडर, पॉलिमर
'आयमा'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेत निर्यातीत भारताचा टक्का वाढत असला तरी, इतर देशांमध्ये समांतर बाजारपेठ शोधणे गरजेचे आहे. नवीन बाजारपेठेत स्थानिक उद्योगांना चांगला दर मिळू शकतो. त्यातून मोठी उलाढालही वाढू शकते. सरकार आणि आयमा संयुक्तपणे यासाठी सक्रीय भूमिका घेत असल्याने, भविष्यात यापेक्षाही निर्यातीचे चांगले आकडे समोर येऊ शकतात.ललित बुब, अध्यक्ष, आयमा.