Dengue
डेंग्यू प्राणघातक आहे Pudhari News Network
नाशिक

नाशिककरांनो काळजी घ्या! डेंग्यू रुग्णसंख्या पाचशेच्या घरात गेली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरात डेंग्यूचा उद्रेक झालेला असून, गेल्या आठवडाभरातच या आजाराचे १०४ नवे रुग्ण आढळले आहेत. बाधितांमध्ये १७ लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यू रुग्णसंख्या ४६९वर पोहोचली आहे. डेंग्यूचा सर्वाधिक प्रभाव सिडकोत विभागात दिसून येत आहे. डेंग्यूबरोबरच चिकुनगुनियाचाही प्रादुर्भाव झाला असून, 15 दिवसांत या आजाराचे ११ नवे रुग्ण आढळल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरातील इतर विभागांच्या तुलनेत सिडकोमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. सिडकोत २७, नाशिक रोड २२, नाशिक पूर्व व पंचवटीत प्रत्येकी १६, नाशिक पश्चिममध्ये ११, तर सातपूर विभागात १० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच २०० जणांना या आजाराची लागण झाल्याने डेंग्यू रुग्णसंख्येचा मागील विक्रम या महिन्यात मोडीत निघतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

स्वाइन फ्लू पाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव शहरात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मे महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले होते. जूनमध्ये डेंग्यूने कहर केला. रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊन महिनाभरातच १५५ नवे रुग्ण आढळले. वाढत्या रुग्णसंख्येचे गांभीर्य ओळखून केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने नाशिकला भेट देत पाहणी केली. डेंग्यू नियंत्रणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. मात्र पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूला निमंत्रण देणारी ठरली. या डबक्यांमध्ये डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती झाल्यामुळे जुलैत डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरात १०४ नवे रुग्ण आढळले आहेत.

डास उत्पत्तीस्थळ शोध मोहीम सुरू

डेंग्यू निर्मूलनासाठी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे ॲक्शन मोडवर आल्या असून, डेंग्यूच्या उद्रेकास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांच्या नेतृत्वाखाली १८१ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत सोमवार (दि. १५) पासून शहरभर मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेची पथके घरोघरी भेटी देऊन डास उत्पत्तीस्थळांची पाहणी करीत आहेत. घर तसेच आस्थापनांमध्ये, लगतच्या परिसरात डासांचे उत्पत्तीस्थळ आढळल्यास प्रत्येक उत्पत्तीस्थळाकरिता २०० रुपये दंडाची कारवाई या पथकांमार्फत केली जात आहे.

'कोरडा दिवस' पाळण्याचे आवाहन

डेंग्यू प्रादुर्भावास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते. आठवडाभराहून अधिक काळ साठवून ठेवलेले पाणी, फुलदाण्या, फ्रीज ट्रे, घर परिसरातील उघड्यावरील भंगार साहित्य, निकामी टायरमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी पाच दिवसांहून अधिक दिवस घरांमधील भांड्यांमध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मलेरिया विभागप्रमुख डॉ. रावते यांनी केले आहे.

चिकुनगुनियाचे ११ नवे रुग्ण

डेंग्यूबरोबरच शहरात चिकुनगुनियाचीही साथ सुरू आहे. गेल्या आठवडभरात डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात सिडकोमध्ये ३, नाशिक पश्चिममध्ये ४, सातपूर ३ व नाशिक पूर्व विभागातील एका बाधिताचा समावेश आहे. आतापर्यंत ३५ जणांना चिकुनगुनिया या आजाराची लागण झाली आहे.

'त्या' वृद्धाचा मृत्यू डेंग्यूमुळेच

गोविंदनगरमधील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू गेल्या पंधरवड्यात डेंग्यूसदृश आजाराने झाला. त्याचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल आला असून त्या वृद्धाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

डेंग्यू सदृश आजाराने महिलेचा चांदवड येथे मृत्यू

चांदवड येथील गणूर रोड परिसरात ३७ वर्षीय महिलेचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या घटनेमुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपरिषद प्रशासनाने तातडीने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चांदवडकरांनी केली आहे.

गणूर रोड परिसरातील महिलेला थंडी ताप आल्याने त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून नाशिक येथील खासगी दवाखान्यात वर्ग करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून थंडी, ताप यासारख्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात सध्या पावसाळा सुरू असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत आहेत. ते डासांची उत्पत्तीस्थान ठरत आहेत. परिणाम, साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

SCROLL FOR NEXT