Swine Flu File Photo
नाशिक

Swine Flu | नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा हाहाकार! ऐन सणासुदीत 'स्वाइन फ्लू'चा प्रादुर्भाव वाढला

Swine Flu | आठवडाभरातच 46 नवे रुग्ण ; प्रशासन अलर्ट मोडवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली असताना नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरातच स्वाइन फ्लूचे ४६ नवे रुग्ण आढळून आल्याने या आजाराने ग्रस्त रुग्णांचा आकडा आता १९३ वर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, सतर्कतेचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश आजारांपाठोपाठ स्वाइन फ्लूचाही उद्रेक पाहायला मिळत आहे. स्वाइन फ्लू हा 'एच१एन१' नावाच्या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसनाचा आजार आहे. हा आजार खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हवेतील थेंबांमार्फत एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे वेगाने पसरतो.

हवामान बदलाच्या काळात याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. पावसाात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने स्वाइन फ्लूच्या व्हायरसचे विषाणू दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक पटीने वाढतो. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत नाशिकसह लगतच्या ग्रामीण भागात २८ स्वाइन फ्लू बाधित रुग्ण होते.

जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत गेला. ऑगस्ट महिन्यात ११९ जणांना या आजाराची बाधा झाली तर सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांतच ४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे स्वाइन फ्लू बाधितांचा आकडा १९३ वर पोहोचला आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय वृद्धा, पिंपळणारेतील ५५ वर्षीय पुरुष तर नाशिक शहरातील आडगाव परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने बळी गेला होता. त्यानंतर विसे मळ्यातील एका महिलेचा तर, सांगलीहून नाशिकमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा स्वाइन फ्लूने बळी घेतला.

डेंग्यू रुग्णसंख्याही 109 वर

नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही भर पडली आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत डेंग्यूचे ५६ रुग्ण होते. ऑगस्टच्या एका महिन्यातच ४५ नवे रुग्ण आढळले, तर सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांतच ८ जणांना या आजाराची लागण झाली आहे.

डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथ रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागातर्फे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे व लक्षणे आढळताच लगतच्या रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT