नाशिक : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकविणारा स्वप्निल कुसाळेच्या यशाने सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजमध्ये गुरुवारी(दि.१) आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
स्वप्नील कुसाळे भोसला मिलिटरी स्कूल आणि कॉलेजचा रामदंडी आहे. स्वप्निलच्या या उज्वल यशाने 'भोसला' च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून भोसला आणि पदक विजेत्या खेळाडूंची यशस्वी परपंरा दर्शवणारे हे नाते कायम असल्याचे दिसते, अशा प्रतिक्रिया संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. संस्था आणि संपूर्ण कॅम्पसच्यावतीने स्वप्निलचे अभिनंदन करत पदाधिकारी,क्रीडाशिक्षकांनी त्याच्या शालेय तसेच महाविद्यालयीन काळातील मेहनती वृत्तीला उजाळा दिला आहे .
स्वप्निलने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये असणाऱ्या नेमबाजीच्या क्रीडाप्रबोधीनीद्वारे तत्कालीन राज्य प्रशिक्षक नानासाहेब देशमुख यांच्याकडे खेळाला सुरवात केली. त्याचे नववी व दहावीचे शिक्षण भोंसला स्कूलमध्ये झाले. पुढे ११ वी ते प्रदवीचे प्रथम वर्षे वाणिज्य शाखेचे (सन २०११ ते २०१४) शिक्षणही त्याने भोसला मिलिटरी कॉलेजमधून घेतले. संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, सरकार्यवाह हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, कार्यवाह मिलिंद वैद्य आदीं पदाधिकाऱ्यांनी स्वप्निलच्या य़शाबद्दल अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. नियमित सराव,कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शनामुळेच त्याला हे यश संपादन करता आले. त्याने भारतासाठी पदकाची कमाई करून उल्लेखनिय कामगिरी केली, याचा नक्कीच अभिमान आहे, त्याचे यश इतर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी असेल, असे कौतुकोद्गार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.