नाशिक

Nashik BJP | काही तासांत सुनील केदारांचा 'यू टर्न'

Nashik BJP | भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा अखेर घेतला मागे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या महापौर- उपमहापौर उमेदवारीवरून 5 पदाच्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना आव्हान देत भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा भिरकावणाऱ्या सुनील केदार यांनी काही तासांतच 'यू टर्न' घेत आपला राजीनामा मागे घेतला आहे.

प्रदेश पातळीवरून आपले समाधान झाल्याने राजीनामा मागे घेत असल्याचा दावा केदार यांनी केला आहे. यामुळे भाजपमधील राजीनामा नाट्य संपुष्टात आले असले तरी, महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला राडा महापौरपदाच्या खुर्चीपर्यंत कायम राहिल्याने पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

भाजपने पुन्हा एकदा नाशिक महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करत इतिहास रचला असला तरी ही निवडणूक भाजपसाठी चांगलीच वादळी ठरली. निवडणुकीपूर्वी आयारामांना दिलेले आवतन, तिकीट वाटपवेळी झालेला राडा आणि त्यानंतर महापौर उपमहापौर उमेदवार निश्चितीतही भाजपमध्ये नाराजीनाट्य घडले.

महापौरपदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच होती. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुशिक्षित, अनुभवी आणि उच्चशिक्षित अशा हिमगौरी आहेर-आडके तर उपमहापौरपदासाठी पंचवटीतील मच्छिंद्र सानप यांची उमेदवारी पक्षातर्फे निश्चित केली गेली. यासाठी कुंभमेळामंत्री महाजन यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ही उमेदवारी पत्रकार परिषदेत घोषित केली होती.

परंतु, प्रदेशाध्यक्षाकडून आलेले नाव बदलून उमेदवारी जाहीर केली गेल्याचा आरोप करत केदार यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देत थेट मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांना आव्हान दिले होते. त्यामुळे राज्यभर भाजपला पुन्हा नाचक्की सहन करावी लागली. समाजमाध्यमांत उमटलेल्या प्रतिक्रिया भाजपच्या बदनामीत भर घालणाऱ्या ठरल्या. प्रदेश कार्यालयाने याची गंभीर दखल घेत केदार यांची कानउघाडणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीपासून ते महापौर उमेदवारी निश्चितीपर्यंतचा घटनाक्रम लक्षात घेता सुनील केदार यांची भूमिका पक्षाला अडचणीत आणणारी ठरल्याची चर्चा कार्यकत्यांमध्ये आहे.

तिकीटवाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर महापालिकेत बहुमत मिळूनही विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादीला सत्तेत सहभागाची चर्चा केदार यांनी परस्पर सुरू केल्याने कुंभमेळामंत्री महाजन यांना पुढे येत आम्हाला कुबड्यांची गरज नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आता केदार यांनी महापौर-उपमहापौर उमेदवारीवरून थेट मुख्यमंत्री, कुंभमेळामंत्र्यांनाच आव्हान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नव्या शहराध्यक्ष निवडीच्या हालचाली

केदार यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोनही घेतले नाहीत. ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात आल्यानंतर कोअर कमिटीला पाचारण करत तत्काळ नवीन शहराध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोअर कमिटीने शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांशी बुधवारी (दि. ४) बंद दाराआड चर्चा केली होती.

ज्या कारणांमुळे मी भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्या विषयांवर प्रदेश भाजपबरोबर माझी सविस्तरपणे चर्चा झाली आहे. माझे समाधान झाले आहे. प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार मी माझा राजीनामा मागे घेतला आहे.
- सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT