Sugar  Pudhari
नाशिक

Sugar Price Hike Impacts | सणासुदीच्या तोंडावर नाशिककरांच्या खिशाला कात्री; मिठाईच्या दरात किलोमागे 20 ते 40 रुपयांची वाढ!

Sugar Price Hike Impacts | सणासुदीत किलोमागे 20 ते 40 रुपयांची दरवाढ ; ग्राहकांचे बजेट बिघडणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शहरातील मिठाई व्यवसायावर होण्याची शक्यता मिठाई व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे आगामी काळात मिठाईच्या दरात किलोमागे २० ते ४० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता मिठाई विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिसाला आणखी झळ बसणार आहे.

श्रावण महिन्यापासून सणासुदीला सुरुवात झाली असून, प्रत्येक सणाला गोडाधोडाचे नैवेद्य, मिठाई यांना मागणी वाढते. त्यामुळे साहजिकच विविध प्रकारच्या मिठाईच्या मागणीत सण, उत्सव आणि कौटुंबिक समारंभामध्ये वाढ होते.

पेढा, बर्फी, गुलाबजामून, रसगुल्ला यांच्यासह विविध मिठाई तयार करण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. साखरेच्या दरवाढीसोबतच दूध, खवा, तूप, ड्रायफूट आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे.

मिठाई विक्रेत्यांच्या मते, साखरेच्या वाढलेल्या दराचा परिणाम लगेच ग्राहकांवर न करता, काही काळ विक्रेते स्वतःचा नफा कमी करून, दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दरवाढ कायम राहिल्यास मिठाईच्या विक्री दरात बदल करणे अपरिहार्य असल्याचे मिठाई व्यावसायिक सांगत आहेत.

दरम्यान, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होणार आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

"दोन महिन्यांतच साखरेच्या दरात शेअर बाजाराप्रमाणे चढ-उतार होत आहेत. श्रावण, गणेशोत्सवापासून सणसमारंभांची रेलचेल सुरू होत असून, मिठाईच्या मागणीतही वाढ होणार आहे. मिठाईचे दर वाढले, तरी भाविकांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिठाईला कायम मागणी राहते."
— अमित यादव, मिठाई विक्रेता, नाशिकरोड
"साखरेच्या दरात दुप्पट वाढ झाल्यामुळे मिठाईच्या दरातही २० ते ४० रुपयांची वाढ करावी लागली आहे. ५६० रुपयांची मिठाई ६००, तर ३०० रुपयांची मिठाई ३२० रुपयांना झाली आहे. दुधाच्या दरात २० रुपयांची वाढ तसेच तुपाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सणासुदीला ग्राहक मिठाई घेतील, मात्र प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
— ललित वाघ, बुधा हलवाई
"घरगुती पद्धतीने पुरणपोळी व पुरणाचे मांडे तयार करून देतो. साखरेच्या दरात वाढ झाल्याने पुरणपोळी तयार करण्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच पुरणपोळीच्या दरातही वाढ करणे क्रमप्राप्त आहे. ग्राहकांनी दरवाढीमागील कारण समजून घ्यावे."
— अर्चना कुलकर्णी, श्रीराम फूट्स
"साखरेच्या दरात प्रथमच झालेल्या वाढीचा परिणाम मिठाईच्या दरांवरही होणार आहे. आम्हालाच वाढीव दराने साखर खरेदी करावी लागत असल्यामुळे मिठाईच्या दरात वाढ करणे अपरिहार्य आहे. या भाववाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे."
— दीपक चौधरी, सागर स्वीट्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT