नाशिक : निखिल रोकडे
वेगवान जीवनशैली, सोशल मीडियावरील झगमगाट आणि कमी वेळेत अधिक पैसा कमाविण्याच्या हव्यासामुळे १८ ते २५ वयोगटांतील काही युवक-यवती वयाने मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याकडे वळत असल्याचे चित्र समोर येत आहे. 'शुगर डॅडी' आणि 'शुगर मॉम' या नावाने ओळखली जाणारी ही संकल्पना सुरुवातीला मेट्रो शहरांपुरती मर्यादित होती. मात्र आता तिचे लोण हळूहळू इतर शहरांपर्यंत पोहोचत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या प्रकारात आर्थिक मदत, महागड्या भेटवस्तू, आलिशान जीवनशैली, परदेश प्रवास किंवा इतर सुविधा मिळण्याच्या बदल्यात सहवास, भावनिक जवळीक वा शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवली जाते.
वरकरणी हे संबंध परस्पर संमतीने होत असल्याचे दिसत असले, तरी त्या मागील आर्थिक व्यवहार आणि शक्तीचे असमतोल समीकरण अनेकदा शोषणाला खतपाणी घालते. महागाई, वाढता शिक्षण खर्च, ब्रँडेड जीवनशैलीचे आकर्षण आणि सोशल मीडियावरील दिखाऊ श्रीमंती यामुळे काही तरुण या मोहजाळात अडकत असल्याचे दिसते. 'शुगर डॅडी - शुगर मॉम' संस्कृती ही आधुनिकतेचे प्रतीक नसून, वाढती आर्थिक विषमता, उपभोगवादी मानसिकता आणि मूल्यांची घसरण यांचे प्रतिबिंब असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. या प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत. पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधणे, शैक्षणिक संस्थांनी करिअर व आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करणे आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे तितकेच आवश्यक आहे. क्षणिक चैनीच्या मोहापेक्षा स्वकर्तृत्वाने उभे राहण्याची प्रेरणा देणे हीच बाब या वाढत्या सामाजिक प्रवाहावर प्रभावी मात ठरू शकते.
'शुगर डॅडी' संकल्पनेचा जन्म कुठे झाला?
सन १९०८ मध्ये अमेरिकेत 'शुगर डॅडी' हा शब्दप्रयोग प्रथम झाला. स्प्रेकेल्स शुगर कंपनीचे उद्योगपती अॅडॉल्फ स्प्रेकेल्स यांनी स्वतः पेक्षा २४ वर्षांनी लहान अल्मा डी ब्रेटव्हिल यांच्याशी विवाह केला होता. साखर उद्योगातील अफाट संपत्ती आणि पत्नीच्या महागड्या हौशी पूर्ण करण्याच्या स्वभावामुळे अल्मा त्यांना प्रेमाने 'शुगर डॅडी' असे संबोधत. १९२० च्या दशकात साहित्य आणि रंगभूमीवर या शब्दाचा वापर सुरू झाला. पुढे अमेरिकन शब्दकोशांमध्ये 'शुगर डॅडी' या शब्दाची अधिकृत नोंद झाली. १९७०-८० नंतर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढल्याने 'शुगर मॉम' ही संकल्पनाही उदयास आली. २००६ नंतर विविध ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्ममुळे 'शुगर डॅडी-शुगर मॉम' संकल्पनेचा प्रसार जगभर झपाट्याने झाला.
झटपट पैसा, चैनीची जीवनशैली किंवा सामाजिक दबावामुळे काही युवक-युवती 'शुगर डॅडी-शुगर मॉम' सारख्या नात्यांकडे आकर्षित होतात. मात्र अशा संबंधांमुळे ब्लॅकमेल, मानसिक तणाव, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का तसेच आरोग्यविषयक गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. क्षणिक आकर्षणापेक्षा सुरक्षित भविष्य आणि स्वाभिमानाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दीर्घकालीन परिणाम समजून घेणे, गरज असल्यास समुपदेशकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
- कौन्सिलर मीनाक्षी जगदाळे, हॅपी लाइफ काउन्सिलिंग सर्व्हिसेस
टीव्ही आणि सोशल मीडियावरील हिंसा, लैंगिकता व गुंतागुंतीच्या नात्यांचे अतिरेकी चित्रण मुलांच्या भावनिक विकासावर परिणाम करू शकते. अशा गोष्टींवर बंदी हा उपाय नसून, पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि शाळा -महाविद्यालयांनी समुपदेशनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला वेळेत घेतल्यास गंभीर मानसिक परिणाम टाळता येऊ शकतात.
- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ
वयस्कर व्यक्तीकडे आकर्षित होण्यामागे भावनिक सुरक्षिततेची गरज, बालपणीच्या नातेसंबंधांचा प्रभाव, आर्थिक स्थैर्याची अपेक्षा किंवा परिपक्व व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण अशी अनेक कारणे असू शकतात. काही प्रकरणांत हे लैंगिक कुतुहलातूनही घडते. मात्र अशा नात्यांतील भावनिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम समजून घेऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे.
- प्रमिला पवार, कौन्सिलर ब्रेन सिक्रेट