नाशिक

स्टंटबाजांना पोलिसी हिसका, ११२ सायलेन्सरचा चुराडा

Nashik news | बुलेटचा नाही, आता कायद्याचा आवाज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील कॉलेजरोड परिसरात कर्णकर्कश सायलेन्सर लावून स्टंटबाजी व फटाके वाजवत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या बुलेटचालकांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्याने धडाकेबाज कारवाई केली. जप्त केलेल्या तब्बल ११२ मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोडरोलर फिरवत त्यांचा चुराडा केला.

कॉलेजरोड परिसरात काही तरुणांकडून बुलेटवर मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठा आवाज करीत वेगाने वाहन चालवणे, फटाके फोडणे अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने विशेष मोहीम राबवत अशा चालकांवर कारवाई केली. विविध ठिकाणी सापळे रचून संशयित बुलेटचालकांना पकडण्यात आले. त्यांच्या वाहनावरील बेकायदेशीर सायलेन्सर काढून कॉलेजरोड पोलिस चौकीत जप्त करण्यात आले. गुरुवारी (दि. ३०) या जप्त सायलेन्सरवर कॉलेजरोड पोलिस चौकी येथे रोडरोलर फिरवून त्यांचा नाश करण्यात आला. या कारवाईमुळे स्टंटबाजांत खळबळ उडाली आहे.

यापुढे अशा प्रकारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, उपनिरीक्षक भारत पाटील, हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते यांनी ही कारवाई पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT