जुन्या नाशिकमधील खडकाळी परिसरात बुधवारी (दि.20) रात्री दुमजली जुने घर कोसळून आठ जण गंभीर जखमी झाले.  Pudhari News Network
नाशिक

Structural Audit : जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना

Nashik News : खडकाळीतील जुने घर कोसळल्याच्या घटनेनंतर महापालिकेचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक , नाशिक : जुन्या नाशिकमधील खडकाळी परिसरात जुने दुमजली घर कोसळून आठ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहरातील ३० वर्षांहून अधिक जुने वाडे, इमारती तसेच घरांचे संरचनात्मक परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करून महापालिकेच्या विभागीय कार्यालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागाने दिले आहेत.

पावसाळ्यात दरवर्षी जुने वाडे, घरे कोसळण्याच्या घटना घडतात. गतवर्षी रविवार कारंजा परिसरातील विठ्ठल पार्कमधील जीर्ण इमारतीच्या दोन बाल्कनी कोसळल्या होत्या, तर पंचवटी विभागातील पेठ रोड, फुलेनगर, गौंडवाडीतील घरकुल योजनेचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबक नाका पोलिस चौकीमागील खडकाळी परिसरात दोनमजली पक्के बांधकाम असलेले घर कोसळले. यात आठ जण जखमी झाले. या घटनेनंतर शहरातील जीर्ण वाडे, जुन्या इमारती, घरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या इमारती कोसळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, स्ट्रक्चरल ऑडिटच्या नियमाची आठवण महापालिकेच्या नगररचना विभागाला झाली आहे.

..तर भोगवटादारांना 25 हजारांचा दंड

३० वर्षांहून अधिक जुन्या इमातरतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम आहे. महापालिकेकडे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज, सिव्हिल टेक आणि संदीप पॉलिटेक्निक या संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मुभा इमारतमालक, भोगवटादारांना देण्यात आली आहे. त्यांनी या संस्थांशी संपर्क साधून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिकेकडे सादर करणे अपेक्षित असून, या अहवालात सुचविलेल्या दुरुस्त्या संबंधित इमारतमालक, भोगवटादाराने करणे आवश्यक आहे. ऑडिट न झाल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

Nashik Latest News

महापालिका हद्दीतील ३० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व इमारती, घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. अहवालात सुचविलेल्या दुरुस्त्या करून इमारत राहण्यायोग्य करणे अथवा अतिधोकादायक असल्यास इमारत, घरांतील रहिवाशांनी ती रिकामी करणे गरजेचे आहे.
सचिन जाधव, कार्यकारी अभियंता, नगररचना, नाशिक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT