नाशिक : मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गंभीर झालेला असताना, महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली श्वान निर्बीजीकरण मोहीम पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मुकणे धरण विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत विल्होळी येथे प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्र उभारणीत अडथळा ठरत असलेली श्वान निर्बीजीकरण केंद्राची इमारत पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत श्वान निर्बीजीकरण ठेक्याची प्रक्रिया थांबवावी लागण्याची शक्यता आहे
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मुकणे धरण विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मुकणे धरणावरील पंपिंग क्षमतेत वाढ केली जाणार आहे. विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रातून साधुग्रामपर्यंत मुख्य गुरुत्ववाहिनी टाकली जाणार आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली आहे. सद्यस्थितीत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. संबंधित मक्तेदार कंपनीला कामाचे कार्यादेश लवकरच दिले जाणार आहेत. या पाडकामासाठी जेडब्ल्यूआयएल इन्फ्रा लि. ही कंपनी करणार आहे. यासाठी ६.९२ लाख रुपये महापालिका मोजणार आहे. दरम्यान, यामुळे श्वान निर्बीजीकरणाचे काम ठप्प होण्याची भीती आहे.
पर्यायी व्यवस्था करणार
श्वान निर्बीजीकरणाचे कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी पर्यायी जागा शोधली जात आहे. विल्होळी येथील जकात गोडाऊन जागेत श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारले जाणार आहे. श्वानांचे पिंजरे व इतर आवश्यक वस्तू हलविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुकणे धरण विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्र उभारणीत अडथळा ठरणारे श्वान निर्बीजीकरण केंद्र हटवले जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, महापालिका