Road Potholes Pudhari
नाशिक

Nashik Potholes News | सोशल मीडियावर लाईक्स नव्हे, आता नाशिककरांचा जीव वाचवा !

Nashik Potholes News | खड्ड्यांच्या समस्येविरोधात काँग्रेस आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या नाशिकमध्ये आज नागरिक विकासाच्या नावाखाली नव्हे, तर खड्ड्यांच्या दहशतीखाली जगत आहेत. प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी केवळ रील्स, फोटो आणि प्रसिद्धीच्या झोतात व्यग्र असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज नागरिकांचे बळी जात आहेत.

त्यामुळे 'सोशल मीडियावर लाईक्स मिळवणे बंद करा आणि आधी नाशिककरांचा जीव वाचवा,' असा जोरदार घणाघात काँग्रेसचे नगरसेवक सुफीयान जीन यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौरांना थेट पत्र पाठवून महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक इशारा दिला आहे.

महापौरांना दिलेल्या पत्रात सुफीयान जीन यांनी नाशिकमधील बिकट परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला. आज शहरात जिथे नजर टाकाल तिथे रस्ते खचलेले, पाण्याखाली लपलेले खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य दिसते.

नागरिक खड्ड्यांत पडून गंभीर जखमी होत आहेत, काहींचे हात-पाय तुटत आहेत, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. मात्र, प्रशासनाला रस्त्यावरील खड्डे दिसण्याऐवजी केवळ कॅमेरे आणि उद्घाटनांची प्रसिद्धीच दिसते, असा थेट टोला त्यांनी लगावला.

प्रसिद्धीसाठी रील्स बनवण्यापेक्षा अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकदा पावसात दुचाकीवरून या रस्त्यांवरून प्रवास करून पाहावा, मग खड्ड्यांचे वास्तव कळेल, असे आव्हानही त्यांनी पत्रात दिले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू असली, तरी हा विकास नागरिकांसाठी नसून ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी आहे का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

..काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

१. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना तातडीने काळ्या यादीत टाका.

२. दुर्लक्ष करणाऱ्या आणि जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

३. सर्व धोकादायक रस्ते तातडीने सुरक्षित करून, खोदकामाच्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या.

४. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.

ठेकेदारांना कोणाचे संरक्षण ?

निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे दररोज शेकडो नागरिक मणक्याच्या आणि कंबरदुखीच्या दुखापतींमुळे रुग्णालयात पोहोचत आहेत. महापालिका हजारो खड्डे बुजवल्याचा दावा करते, पण पहिल्याच पावसात डांबर वाहून जाते. त्यामुळे या निकृष्ट कामांमागे ठेकेदारांना कोणाचे संरक्षण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT