नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्याचे राजकारण थांबवा. 'ऑपरेशन टायगर'पेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा,' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, पेपरफुटी, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
'सरकारने आता दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावी. पाहणी दौरे नकोत, मदत सुरू करा,' अशी मागणीही त्यांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मंगळवारी (दि. २२) शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. राजगड मध्यवर्ती कार्यालयात गणरायाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, सरकारच्या धोरणांवर टीका केली.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे शासनाने कोणताही विलंब न करता दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या घोषणेचा संदर्भ देत ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. 'मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असे सांगितले गेले. गेल्या बारा वर्षांत तेरा वेळा दुष्काळमुक्तीच्या घोषणा झाल्या.
मग नेमक्या कोणत्या पिढीला दुष्काळमुक्त करणार?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार असून, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, कैलास मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पेपरफुटीवरून सरकारवर निशाणा
पेपरफुटीच्या घटनांवरही ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. 'विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि शेवटी पेपर फुटतो. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. आंदोलन केल्यानंतरच सरकारला जाग येते,' अशी टीका त्यांनी केली.
शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत संबंधित मंत्र्यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 'प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागल्यानंतरच सरकार कारवाई करणार का?' असा सवाल त्यांनी केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा
नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. संबंधित मंत्र्यांशी स्वतः चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थाच्या नियोजनावर विचारणार प्रश्न
'सिंहस्थासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतानाही नागरिकांचे हाल होत आहेत. मी पुन्हा नाशिकला येणार असून, कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारणार आहे,' असे अमित ठाकरे यांनी सांगितले. सिंहस्थाच्या नियोजनातील कथित भ्रष्टाचाराबाबत आपल्याकडे माहिती असल्याचा दावा करत, 'नाशिकला येऊन याबाबत सविस्तर बोलेन,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
डीजेच्या आवाजावरूनही भूमिका
डीजेच्या आवाजाबाबत विचारले असता, गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याची भूमिका त्यांनी मांडली. 'राजसाहेबांनी याबाबत भूमिका मांडली आहे. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा झाला पाहिजे. समोरचा आवाज वाढवतो म्हणून आपणही आवाज वाढवायचा, असे होऊ नये,' असेही ठाकरे म्हणाले.