सारोळे-थडीत मध्यरात्री भीषण अपघात
५५ प्रवाशांसह कुटुंबिय बचावले
लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव स्लीपर कोच बस थेट घरात घुसल्याने निफाड तालुक्यातील सारोळे-थडी येथे खळबळ उडाली. विंचूर - घोटी सिमेंट काँक्रिट मार्गावरील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात घराची दर्शनी भिंत जमीनदोस्त झाली.
विशेष म्हणजे, घरात झोपलेले आव्हाड कुटुंबिय आणि बसमधील ५५ प्रवासी अशा सर्वांचे प्राण सुदैवाने बचावले. वारंवार मागणी करूनही या वळणावर सुरक्षा उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्लीपर कोच बस (एम.एच. १९.सी. वाय. ००८१) खेडलेझुंगेमार्गे धुळ्याकडे जात होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास विंचूर - घोटी मार्गावरील सारोळेथडी येथील तीव्र वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तसेच बसच्या वेगावर नियंत्रण न राहिल्याने बस थेट बाळसाहेब नामदेव आव्हाड यांच्या घराला जाऊन धडकली.
धडक इतनी जोरदार होती की, घराच्या दर्शनी भिंतीचे पूर्णतः नुकसान झाले. मध्यरात्रीच्या शांततेत झालेल्या जोरदार आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातावेळी आव्हाड कुटुंबिय घरात गाढ झोपेत होते, तर बसमध्ये तब्बल ५५ प्रवासी प्रवास करीत होते. सर्वजण थोडक्यात बचावले.
सारोळे-थडी येथील हे वळण वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वळणाचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी गोकुळ मुरलीधर नागरे, बाळासाहेब नामदेव आव्हाड, अजिंक्य भिसे, विक्रम त्र्यंबक आव्हाड, गणेश लक्ष्मण नागरे, राजेंद्र कारभारी नागरे, बाळासाहेब बबन आव्हाड, चंद्रकांत यशवंत नागरे यांच्यासह ग्रामस्थांनी वारंवार केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप ठोस उपाययोजना झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.