नाशिक : अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने विशेष फेरी जाहीर केली आहे. प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची संधी मिळणार आहे. विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज भाग १ आणि २ लॉक करणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेशाची संधी गमावू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी (दि. २१) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ पासून २४ ऑगस्ट सायंकाळी ६ पर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील भाग १ मधील दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. कोट्यातील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनाही या कालावधीत पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करावा लागणार आहे.
२५ ऑगस्टला अलॉटमेंट प्रक्रिया होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी वाटप झालेल्या महाविद्यालयाची माहिती पाहता येईल. या प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जात कागदपत्र पडताळणी, शुल्क भरत प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास प्रवेशाची संधी प्रभावित होऊ शकते.
अधिकृत पोर्टलवरच प्रक्रिया
विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरूनच करावी. विशेष फेरीचे वेळापत्रक, रिक्त जागा, अलॉटमेंट आणि प्रवेशाशी संबंधित माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष फेरीचे टप्पे
२३ ऑगस्ट - सकाळी ११ रिक्त जागा जाहीर
२३ ऑगस्ट - दुपारी १ पासून नोंदणी, दुरुस्ती, पसंतीक्रम
२५ ऑगस्ट - अलॉटमेंट प्रक्रिया
२५ ऑगस्ट -
दुपारी ३ पासून प्रवेशनिश्चिती
२८ ऑगस्ट - कनिष्ठ महाविद्यालयात कामकाज
२९ ऑगस्ट - डेटा प्रोसेसिंग
१० पसंतीक्रम अनिवार्य
विद्यार्थ्यांनी किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. पसंतीक्रमानंतर प्रवेश अर्ज भाग -१ आणि २ लॉक करावा लागेल. वाटप झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहत कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे