नाशिक/देवळाली कॅम्प : गावाचा विकास केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता कायमस्वरूपी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत ग्रामस्थांनी पुढाकार घेतला तर गावांचा कायापालट निश्चितच होऊ शकतो, गावाचा विकास ही निरंतर प्रक्रिया त्यामुळे प्रत्येकाने ग्रामविकासात सहभाग घ्यावा, आपल्या गावाच्या विकासासाठी सातत्याने योगदान देण्याचे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत दुगाव, दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत जानोरी व निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत उंबरखेड येथे सुरू असलेल्या विकासात्मक कामांची पाहणी करत गावकऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना कुलकर्णी म्हणाल्या, गावातील विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी आम्हाला येथे बोलावण्यात आले. मात्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे पाहिल्यानंतर असे वाटते की, आमच्या येण्याचीही गरज नाही इतक्या प्रचंड जोशात आणि आत्मीयतेने प्रत्येक गावकरी या अभियानात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनीही ग्रामपंचायत उंबरखेड येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन करत नियोजनबद्ध, पारदर्शक व लोकाभिमुख ग्रामपंचायत प्रशासनावर भर दिला. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हीच या अभियानाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळी 8:30 वाजता ग्रामपंचायत दुगाव येथे कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत जानोरी व दुपारी 4 वाजता ग्रामपंचायत उंबरखेड येथे कार्यक्रम पार पडला. या सर्व ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दुगाव येथे कामकाज पाहणीसाठी अभिनेत्री कुलकर्णी आल्या होत्या. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी महिला बचत गटाच्या सेंद्रिय खत, गांडूळखत प्रकल्पाचे, तर आमदार सरोज आहिरे यांनी सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन केले. गावाच्या, शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्घाटन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
तत्पूर्वी दुगाव फाटा ते गाव या रस्त्यावर सुबक रांगोळीकार संगीता पवार यांनी सुरेख रांगोळी काढली, अभिनेत्री कुलकर्णी यांचे ग्रामस्थांनी वाजतगाजत स्वागत केले. गावभेटीत सोनाली कुलकर्णी यांनी अंगणवाडी, बचतगट शेती प्रकल्प, आरोग्य केंद्र, वृक्षारोपण, शाळा यांची पाहणी केली. यावेळी स्थानिक लाभार्थींना पीएनजेवाय कार्ड वाटप करण्यात आले.
वयस्कर रुग्णास मोफत उपचार व डायलिसिसबद्दल आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. परसबाग व लहान मुलांचे पोषण आहार बाबतीत त्यांनी माहिती घेतली. शाळेतील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आयडीबीआय बँकेकडून प्राथमिक शाळेला शाखाधिकारी रोहित मोहेकर यांनी 55 इंच टीव्ही व संगणक दिले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉ. वर्षा फडोळ, नाशिक पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप उपस्थित होत्या.