Smartphone, facility card fraud in prison exposed
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्मार्टफोन सुविधा कार्ड (लन कार्ड) संदर्भात गैरव्यवहार उघडकीस आला असून, कारागृह शिपाई, शिक्षा भोगत असलेला बंदीवान आणि इतर अज्ञात आरोपींवर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथील दक्षता पथकाचे प्रदीप हारगुडे यांच्या फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान कारागृह शिपाई वैभव नामदेव लांडगे आणि कैदी दीपक रामभाऊ ढाकणे यांनी अज्ञात व्यक्तींशी संगनमत केले. स्मार्टफोन सुविधा कार्ड (लन कार्ड) मिळवण्यासाठी त्यांनी ठाणे अंमलदार, कोपरगाव शहर आणि कराड पोलिस ठाणे यांच्या नावाने बनावट शिक्के व खोट्या सह्या तयार केल्या. या बनावट कागदपत्रांवर पोलिस व्हेरिफिकेशन खरे असल्याचे दाखवून शासन व कारागृह प्रशासनाची दिशाभूल केली. कारागृह भेट आणि नंतर केलेल्या चौकशीत हारगुडेंच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नाईकवाडे करीत आहेत.
दीपक ढाकणे हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याने स्मार्टफोन सुविधा कार्ड हे चुकीचे कागदपत्रे देऊन घेतल्याचे उघड झाले. हे स्मार्ट कार्ड आपल्या कोणत्याही तीन नातेवाइकांशी बोलण्यासाठी वापरता येते. त्याची आता कारागृहातून मुक्तता झाली आहे. त्यानंतर हा गुन्हा उघडकीस झाला आहे.