देवगावला सहावा बिबट्या जेरबंद  pudhari photo
नाशिक

Leopard Rescue : देवगावला सहावा बिबट्या जेरबंद

बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित करण्यासाठी बिबट्याला धरले चार तास रोखून

पुढारी वृत्तसेवा

देवगाव/ निफाड : परिसरातील गावांत बिबट्याचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना 14 जानेवारीला मध्यरात्री किशोर दत्तू बोचरे यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अंदाजे 6 वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला. कधी काळी मोरांचे माहेरघर असलेले देवगाव बिबट्याचे माहेरघर बनले आहे.

मागील आठवड्यात देवगाव शिवारातच बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. परिसरात दोन किलोमीटरच्या परिघातात अवघ्या 62 दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांत कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने व वाढत्या बिबट्याच्या प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत देवगाव, महादेवनगर, वाकद, शिरवाडे, कानळद, रुई, धानोरे, कोळगाव या अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवणक्षेत्र घोषित करण्यासाठी ग्रामस्थांनी पकडलेल्या बिबट्याला चार तास रोखून धरले.

यावेळी येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी ग्रामस्थांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन देत बिबट्याला म्हसरूळ येथील वन्यजीव संरक्षण केंद्रात हलवले. यावेळी उपसरपंच लहानू मेमाणे, मनोहर बोचरे, किशोर बोचरे, भागवत बोचरे, धनजंय जोशी, पोलिसपाटील सुनील बोचरे अजीज काद्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे, निफाडच्या आधुनिक पथकातील सदस्य भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक यांनी बिबट्यास ताब्यात घेऊन निफाडला नेले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बिबट्यास नाशिकमधील म्हसरूळ येथील वन्यजीव संरक्षण केंद्रात नेण्यात आले.

दोन वासरांसह कुत्र्याचा फडशा

बिबट्याने संदीप बोचरे व सचिन बोचरे यांचेवासरू व पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. शिवाजी पवार यांच्या घराच्या ओट्यावरच बिबट्याने एक तास ठाण मांडले होते. कानळद रस्त्यावरील सोमनाथ कदम यांच्या शेळीच्या कळपावर हल्ला केला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT