एमडी विक्री,चोरी, लूटमारीतील सहा अट्टल जेरबंद File Photo
नाशिक

MD theft and robbery case : एमडी विक्री,चोरी, लूटमारीतील सहा अट्टल जेरबंद

उपनगर पोलिसांकडून तीन गुन्ह्यांची उकल

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : एमडी ड्रग्ज व दोन गावठी कट्टे बाळगणार्‍या सराईत गुन्हेगारासह तिघे तर जबरी चोरी व लूटमार प्रकरणातील तीन अशा सहा संशयितांना उपनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपआयुक्त किशोर काळे यांनी दिली.

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकातील पोलिस कर्मचारी सूरज गवळी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर दुर्गामाता मंदिर, जुना सायखेडा रोड परिसरात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलिस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, गौरव गवळी, प्रशांत देवरे आदींनी सापळा रचत सौरव महाले (वय 27), कौस्तुभ इखाणकर (वय 24) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 5 ग्रॅम एमडी, 9 हजार रुपये रोख, मोटारसायकल आणि मोबाइल असा एकूण 1.18 लाखांचा मुद्देमाल मिळाला. त्यांच्या चौकशीत मुख्य पुरवठादार इशाद चौधरी या सराईत गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले.

जयभवानी रोड परिसरात राहणार्‍या या सराईत गुन्हेगाराकडून 5 ग्रॅम एमडी आणि दोन गावठी कट्टे असा 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,74,100 रुपयांचा अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.

ट्रकचालकाला लुटणार्‍यास अटक

नाशिक उपनगर पोलिसांनी ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून 9 हजार 200 रुपये व मोबाइल हिसकावणारा आरोपी कार्तिक गोरे (रा. श्रमिकनगर) याला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला. इतर आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

जबरी चोरी करणारे तिघे ताब्यात

धारदार शस्त्राचा धाक दाखवून नशेसाठी जबरी चोरी करणार्‍या तिघांना नाशिक उपनगर पोलिसांनी अटक करून 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी संतोष बसियाल यांना आरोपींनी मदतीच्या बहाण्याने थांबवून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व क्यूआर कोडद्वारे जबरदस्तीने पैसे घेतले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने अजीम शेख, अर्कम पिंजारी व एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटरसायकल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT