नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर रोडवर महापालिकेच्या दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल करून ती लांबास केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी नम्रता ॲडव्हर्टायझिंगचे मच्छिंद्र विजय देशमुख यांच्यासह सहा जणांना गंगापूर पोलिस ठाणे पथकाने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पर्यावरणाची हानी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि रस्त्याचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेहान सर्कल ते बेंडकुळेनगर रस्त्याच्या दुभाजकात सावली व सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या 'टर्मिलिया मादागास्कर' अर्थात 'इंडियन ख्रिसमस ट्री' या विदेशी प्रजातीच्या झाडांची मध्यरात्री कुऱ्हाडीने कत्तल करण्यात आली. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर नागरिकांत संतापाची लाट आहे.
दि. ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ च्या सुमारास सहा आरोपींनी संगनमत करून दुभाजकातील ५५ झाडे विनापरवाना तोडली. झाडे तोडून नेल्याने महापालिकेच्या सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. हिरवाई वाढविण्यासाठी लावलेल्या झाडांवरच घाला घातल्याने पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे झाडांची कत्तल सुरू असतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे हा प्रकार नागरिकांच्या थेट निदर्शनास आला. त्यानंतर विविध माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. याप्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. प्लॉट क्रमांक ३१, राधाई निवास, करंजकरनगर, जेल रोड, नाशिक) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार बुधवारी (दि. १६) रात्री ८ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास करीत सहा संशयितांना अटक केली. झाडे नेमक्या कोणत्या उद्देशाने तोडण्यात आली, कापलेली झाडे कुठे नेण्यात आली आणि या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी वृक्षतोड करून प्रशासनाला आव्हान देणाऱ्यांविरोधात पोलिस यंत्रणा कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सार्वजनिक ठिकाणी वृक्षतोड करून प्रशासनाला आव्हान देणाऱ्यांविरोधात पोलिस यंत्रणा कोणाचीही गय करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वृक्षलागवडीवर अशा प्रकारे कुऱ्हाड चालविणे म्हणजे शहराच्या सौंदर्यावर आणि पर्यावरणीय संतुलनावर थेट आघात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. झाडे तोडण्यामागील हेतू आणि आर्थिक व्यवहार समोर आणण्याची मागणी होत आहे.