नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी प्रथमच पत्रकार परिषद घेत तपासातील महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, भोंदूगिरीच्या नावाखाली आरोपी अशोक खरात महिलांना दैवी शक्ती, चिंचोके, रत्न-खडे व धार्मिक विधींचा आधार देत फसवत होता.
त्याचबरोबर कुटुंबीयांच्या जीविताची भीती दाखवून व बदनामीची धमकी देत तो महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यावेळी उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, अमोल भारती, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक सविता उंडे उपस्थित होते. सातपुते म्हणाल्या की, या प्रकरणातील पीडित महिलांनी अत्यंत धैर्याने पुढे येत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ओळखीचे संरक्षण करणे समाजाची व माध्यमांची नैतिक जबाबदारी आहे.
न्यायालयानेही याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणात आतापर्यंत नाशिकमध्ये १० व अहिल्यानगर जिल्ह्यात २ असे एकूण १२ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे असून, उर्वरित गुन्हे स्थानिक पोलिस यंत्रणा हाताळत आहे.
तपासासाठी तीन पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षकांसह एकूण २४ जणांचे विशेष पथक कार्यरत आहे. तपासादरम्यान ३० साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, आरोपीने श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पीडितांच्या तब्बल ४,६५० व्हिडिओ लिंक सायबर टीमने हटविल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणारे अनेक ग्रुप बंद करण्यात आले असून, व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
तसेच अहिल्यानगर पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे. एसआयटीची स्वतंत्र टीम सतत सोशल मीडियावर लक्ष ठेवून नव्याने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंवर तत्काळ कारवाई करत आहे.
या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासासाठी कागदपत्रे मागवली असून, एसआयटीकडून पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. महिलांनी दाखवलेल्या धैर्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला असून, त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.