Rupali Chakankar News pudhari
नाशिक

Rupali Chakankar SIT Summons | रूपाली चाकणकरांना 'एसआयटी'चे समन्स! भोंदू खरात प्रकरणात थेट पुण्यात धडकले नाशिक पोलिसांचे पथक

Rupali Chakankar SIT Summons |'शिवनिका'च्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकरांना 'एसआयटी'ने समन्स बजावले असून, त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तपासात सहकार्य करत नसल्याची गंभीर दखल घेऊन खरातच्या पोलिस कोठडीत नाशिक सत्र न्यायालयाने एक एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. चाकणकर या खरातच्या शिवनिका संस्थानच्या विश्वस्त होत्या. या अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाणार आहे.

सोबतच शिवनिका संस्थानच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक महिला पोलिसांचे पथक चाकणकरांना समन्स बजावण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहे. त्यांच्यासह शिवनिका संस्थानच्या सदस्यांच्या चौकशीतून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोंदू खरातप्रकरणी चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. पाठोपाठ त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. आता त्यांना विशेष तपास पथकाने समन्स बजावले आहे. शिवनिका संस्थानचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आहेत.

रूपाली चाकणकरांचा पाय खोलात

भोंदू खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांमुळे प्रथमच राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली होती. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव आला होता. आता दोन्ही पदांचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांचा पाय खोलात चालल्याचे दिसून येत आहे.

कोठडीत तीन दिवसांची वाढ

अशोक खरात हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नाशिक सत्र न्यायालयात दिली. याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने भोंदू खरातच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्याचे आदेश दिले.

आता एक एप्रिलपर्यंत त्याचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सोबतच त्याने सुरुवातीपासून न्यायालयात मौन पाळल्याचे दिसून आले आहे. न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाला तो 'हो' किंवा 'नाही' एवढीच त्रोटक उत्तरे तो देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT