President Droupadi Murmu 
नाशिक

President Droupadi Murmu | सायरनचा गजर आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांमुळे नाशिक कुंभनगरीला आले हायप्रोफाइल छावणीचे स्वरूप

President Droupadi Murmu | धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्ताने कुंभनगरीला छावणीचे स्वरूप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सायरनचा गजर... वेगाने धावणाऱ्या वाहनांचे ताफे... चौकाचौकांत खाकी वर्दीचा पहारा आणि प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर! धर्मध्वजारोहण सोहळा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने चार-पाच दिवसांपासून नाशिक शहरात व्हीव्हीआयपी मूव्हमेंटचा धडाका सुरू होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यावरांच्या उपस्थितिने ३१ ऑक्टोबरचा धर्मध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने नाशिककरांना एखाद्या 'व्हीव्हीआयपी सिटी'त वावरत असल्याचा अनुभव आला.

राष्ट्रपतींचा दौरा म्हणजे सुरक्षेच्या सर्वोच्च स्तरावरील नियोजन आणि प्रोटोकॉलचे काटेकोर पालन, त्यांच्या आगमनपूर्वी प्रमुख मार्गावर सुरक्षा वाहनांची वर्दळ, पोलिसांची धावपळ आणि सायरनचे आवाज सातत्याने ऐकू येत होते. धर्मध्वजारोहणामुळे कुंभमेळ्याचे वर्ष आता सुरू झाले आहे. आगामी काळात विविध मान्यावरांचे दौरे, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूकचे नियोजन यांची आव्हाने कायम राहणार आहेत.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून भाविक, पर्यटक आणि मान्यवर नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, वाहतूकव्यवस्था, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय समन्वय यांची सज्जाता महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांतील व्हीव्हीआयपी वातावरण ही नाशिककरांसाठी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जणू रंगीत तालीमच ठरली.

सायरनचा गजर आणि व्हीव्हीआयपी ताफ्यांच्या रेलचेलीमुळे कुंभनगरीला लाभलेली 'व्हीव्हीआयपी सिटी'ची झलक नाशिककरांच्या अनुभवात भर घालणारी ठरली. कुंभमेळ्याची रंगीत तालीम! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यावरांच्या उपस्थितीमुळे बंदोबस्ताची व्याप्ती वाढविण्यात आली.

प्रमुख चौक, महामार्ग, कार्यक्रमस्थळ आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. सीसीटीव्ही व्हड्रोनच्या माध्यमातूनही परिसरावर नजर ठेवण्यात आली. व्हीव्हीआयपींचे ताफे मार्गस्थ होताना वाहतुकीचे नियोजन बदलले जात होते.

सुरक्षाव्यवस्थांचे शहरभर कवच

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील सुरक्षाव्यवस्था विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. प्रमुख चौकांपासून कार्यक्रमस्थळापर्यंत पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. व्हीव्हीआयपींच्या ताफ्यांच्या मार्गावर वाहतुकीचे नियोजन, वाहनांची तपासणी आणि गर्दीचे नियंत्रण यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असल्याने शहरात सर्वत्र सुरक्षा यंत्रणेची उपस्थिती जाणवत होती. वाहनांचे ताफे मार्गस्थ होताना काही काळ वाहतूक थांबविण्यात येत होती. सायरनाचा आवाज ऐकताच नागरिकांचे लक्ष रस्त्याकडे वळत होते. शहरातील नेहमीच्या वर्दळीला या व्हीव्हीआयपी हालचालींमुळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT