Water Crisis Pudhari
नाशिक

Sinnar Water Crisis 2026 | सिन्नर टँकरच्या भरवशावर; 4 गावे, 48 वाड्या तहानलेल्या

Sinnar Water Crisis 2026 | उन्हाची तीव्रता वाढली; जलस्रोत झपाट्याने आटू लागले

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम जलस्रोतांवर होताना दिसत आहे. बंधारे, तलाव, विहिरी आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता गावोगावी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी वाढू लागली आहे.

पंचायत समितीमार्फत सध्या तालुक्यातील चार गावे आणि तब्बल ४८ वाड्यांना १३ खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे दररोज नव्याने टँकरची मागणी येत असून, प्रशासनाकडून त्यासाठी नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात गेल्या काही वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती नियंत्रणात होती.

विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यामुळे तसेच जलसाठे मुबलक प्रमाणात भरल्यामुळे टँकरची गरज जवळपास संपुष्टात आली होती. काही काळ तर तालुक्यातील टँकरची संख्या शून्यावर पोहोचली होती. मात्र, गतवर्षी समाधानकारक पाऊस होऊनही यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

उन्हाच्या वाढत्या झळांमुळे ग्रामीण भागातील विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी बंधाऱ्यांतील पाणीसाठा तळ गाठत असून, वाड्या-पाड्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या भागांमध्ये टँकर सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान पंचायत समिती प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. शासनाकडून डिझेलसाठी निधी वेळेत उपलब्ध झाला नाही, तर येत्या काळात पाणीपुरवठा व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाचा पारा वाढत असताना पाण्याची मागणी वाढत आहे आणि उपलब्ध जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे येता काळ अधिक कठीण ठरण्याची शक्यता वर्तविली जात असून, प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

नवीन टँकर प्रस्ताव दाखल

ग्रामपंचायत काही गावांकडून नव्याने टँकर सुरू करण्यासाठी प्रस्तावही दाखल करण्यात आले आहेत. वावी गावासह नांदूरशिंगोटे येथील एका वाडीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाला आहे, तर फर्दापूर, सोनारी या गावांसह दोन वाड्या आणि मलढोण येथील सहा वाड्यांचे प्रस्ताव तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

डिझेल बिलांमुळे प्रशासन अडचणीत

एकीकडे पाणीटंचाई गंभीर होत असताना, दुसरीकडे प्रशासनासमोर आर्थिक अडचणींचे संकट उभे ठाकले आहे. राज्य शासनाकडून खासगी टँकरसाठी लागणाऱ्या डिझेलची देयके वेळेत मिळत नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुमारे ४० लाख रुपयांची डिझेल बिले थकीत असल्याने पेट्रोलपंपचालकांकडून डिझेल पुरवठ्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT