सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात देवनदीला मोठा पूर येऊन परिसरातील धरणे तुडुंब भरली असतानाही सोनांबे गावात गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
भरपूर पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींविषयी नाराजी वाढत आहे. गावातील काही सेवाभावी संस्थांनी मागील महिन्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता.
मात्र, पाऊस सुरू होताच टँकर बंद झाले, तर नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू झाला की नाही, याची खातरजमा करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी गावाची पाहणी करून जिल्हाधिकारी, आमदार कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पाहणीदरम्यान सोनांबे, कोनांबे उच्चदाब वीजवाहिनीच्या कामामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले.
त्यांच्या उपस्थितीतीत काही ठिकाणची गळती तातडीने दुरुस्त करण्यात आली असून, उर्वरित दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. महावितरणचे अभियंता मुळे यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्याचे सांगितले.
दरम्यान, ग्रामस्थ गोविंद कडभाने यांनी नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. वीज वितरण कामाच्या ठेकेदाराची गाडी ग्रामस्थांनी एक तासभर अडवून याबाबतचा जाब विचारला आहे.
"पावसामुळे दुरुस्तीचे काम करता आले नाही. पाणीपुरवठा सुरू करताना विविध ठिकाणी गळती निदर्शनास आली. खंडित वीजपुरवठ्यामुळेही कामात अडथळे येत आहेत. लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."प्रमिला पवार, प्रशासकीय सरपंच
"महावितरणकडून वीजवाहिनी टाकताना ग्रामपंचायतीला पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असतानाही त्याने तत्परता न दाखवल्याने ग्रामपंचायत प्रशासनालाच गळती दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले आहे."संभाजी मार्कंडेय, ग्रामविकास अधिकारी