सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगरावर रविवारी (दि. ८) दुपारी १ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून खाक झाली असून, जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच जय भवानी लॉन्सचे संचालक सोपान बोडके यांनी सोनांबे गावातील वृक्षप्रेमी मित्र तसेच सिन्नर शहरातील वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना याबाबत कळविले.
माहिती मिळताच सर्व स्वयंसेवकांनी डोंगराकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत वनप्रस्थ फाउंडेशनने लावलेली सुमारे ६ हजार झाडे जळून गेली, तर वनविभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेली ७हजारांहून अधिक झाडेही आगीत भस्मसात झाली. केवळ झाडेच नव्हे, तर या परिसरात वास्तव्यास असलेले अनेक लहान- मोठे कीटक, प्राणी व पशुपक्षीही आगीत जळून गेल्यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच डोंगरावरील झाडांसाठी बसवण्यात आलेली ड्रिप लाइन व पाण्याची पीव्हीसी पाइपलाइनही जळून खाक झाली असून, पुढील काळात झाडांना पाणीपुरवठा करणे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आग विझविण्याच्या कामात राजेंद्र क्षत्रिय, अभिजित देशमुख, अनिल जाधव, समाधान बोडके, संदीप महावीर खिंवसरा,
दत्तात्रय बो-हाडे, विनोद रोकडे, किरण खिंवसरा, मनोज भंडारी, चंद्रभान वरुंगसे, राणू घोडे वावा, धीरज बोडके, राहुल पवार, जगदीश बोडके, कुणाल बोडके, अभिषेक पवार यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
याशिवाय सिन्नर नगर परिषद आणि मुसळगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाची वाहने आणि कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी मोठे योगदान दिले.
नऊ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
वनप्रस्थ फाउंडेशन आणि स्थानिक स्वयंसेवकांनी गेल्या नऊ वर्षांपासून आई भवानी डोंगरावर वृक्षारोपण व संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून डोंगरावर सुमारे १० हजार ५०० वृक्षरोपे लावली होती. त्यापैकी जवळपास ९५ टक्के झाडे जिवंत ठेवण्यात स्वयंसेवकांना यश आले होते. मात्र दुपारच्या कडाक्याच्या उन्हात आणि जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि मेहनतीवर पाणी फेरले गेले.