Accident Pudhari
नाशिक

Sinnar Pickup Accident | सिन्नरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात! आयशर आणि पिकअपच्या धडकेनंतर वाहनाने घेतला पेट; 4 ठार

Sinnar Pickup Accident | आयशर-पिकअप वाहनाला आग; सात जखमी

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील पंचाळे-शहा रस्त्यावर शिंदेवाडी फाटा परिसरात शनिवारी (दि. ११) मध्यरात्रीनंतर आयशर (एमएच १४, एमटी ३८३९) आणि पिकअप (एमएच १५, जेसी ६३४४) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर पिकअप वाहनाने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून, तर वृद्धेचा पिकअपमधून फेकल्या गेल्याने मृत्यू झाला.

या अपघातात ७ जण जखमी झाले. चालक किरण रवि मोरे (२३), शुभम गणेश नवले (२१), रिंकू शुभम नवले (१९) व मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (६८, सर्व रा. पंचाळे) अशी मृतांची नावे आहेत. पिकअपमधील सर्व प्रवासी पाथरे येथे नातेवाइकांकडे जागरण गोंधळ कार्यक्रमास गेले होते.

तेथून परतताना शनिवारी (दि.११) मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर पिकअपने पेट घेतला. पिकअपचालक किरण मोरे यांच्यासह पुढे बसलेले शुभम नवले, रिंकू नवले या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. शुभम व रिंकू नवले हे पती-पत्नी असून, त्यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.

दरम्यान, सुनीता गणेश नवले (३८), सचिन गणेश नवले (१८), दिव्या गणेश नवले (१७), समीक्षा अनिल गांगुर्डे (९), आदिती पांडुरंग आहेर (१३), आरती पांडुरंग आहेर (९) व देवांश किरण मोरे (२) हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या बाजूस बसलेल्या जखमींनी मोबाइलवरून घटनेची माहिती दिली. त्यामुळे स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातग्रस्त पिकअपमध्ये पुढचे तिघेही अडकून पडले होते. त्यांना बाहेरही पडता आले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

आयशरचालक प्रवीण अशोक काळे (रा. खोडद, ता. जुन्नर) याने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादी गणेश नवले यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिस अधीक्षक बाळासाहेव पाटील, उपअधीक्षक के. के. पाटील, पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक जितेंद्र पाटील, फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन पाहणी केली. दरवाजे तोडून बाहेर काढले मृतदेह एमआयडीसी सिन्नर पोलिस व अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन बंबांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अर्धा तासाने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. अग्निशमन जवानांनी वाहनात अडकलेले मृतदेह दरवाजा तोडून बाहेर काढले. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पंचाळे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT