heavy rainfall pudhari photo
नाशिक

Nashik Heavy Rainfall | "सिन्नर फाटा परिसरात 5 दिवसांपासून घराघरात पाणी! भुयारी गटारांच्या तुंबण्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार पाण्यात"

Nashik Heavy Rainfall | 5 दिवसांपासून घराघरात पाणी; भुयारी गटारांच्या साफसफाईअभावी अनेक कुटुंबांचा संसार पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, साठेनगर व गोदरेजवाडी भागांत अनेक घरांमध्ये शिरलेले पाणी अजूनही ओसरले नसल्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. भुयारी गटारांची वेळेवर सफाईअभावी ही परिस्थिती उद्भवल्यामुळे नागरिकांच्या समस्यांना कोणीही वाली राहिलेले नसल्याची स्थिती आहे.

शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकरोड परिसरातील अनेक सखल भाग जलमय झाले. विशेषतः सिन्नर फाटा परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजून नुकसान झाले. अनेक घरांमध्ये चूलही पेटू शकली नाही.

स्टेशनवाडी, साठेनगर, गोदरेजवाडी आणि सिन्नर फाटा परिसरात एमएनजीएल कंपनीच्या खोदकामामुळे तसेच विविध रस्ते विकासकामांमुळे रस्ते उखडलेले आहेत. याशिवाय जुन्या भुयारी गटारांची क्षमता वाढलेल्या लोकवस्तीच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे.

प्रभागातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी करीत नगरसेवक योगेश भोर आणि शिवसेना युवक अध्यक्ष राहुल ताजनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पाणी उपसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. महापालिकेच्या पथकाने पाण्याचा उपसा केला असला, तरी अनेक घरांत पाणी जैसे थे आहे.

"भुयारी गटारांची साफसफाई एप्रिल - मे महिन्यात होणे अपेक्षित असतानाही ठेकेदार नियुक्तीअभावी नाले तुंबलेलेच राहिले. माझ्या प्रभागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे."
- भारती ताजनपुरे, नगरसेविका, प्रभाग १९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT