सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सायाळे येथे दीर आणि भावजयीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. सुनील थोरात (२६) आणि वैष्णवी थोरात (२५) अशी मृतांची नावे आहेत.
एकाच घरात दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
थोरात यांच्या राहत्या घरापासून शंभर फुटांवरील शेतगट क्रमांक ७४४ मधील स्टोअर रूममध्ये दोघांचे मृतदेह आढळले. शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी सकाळी दोघेही घरातील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर गावकामगार पोलिसपाटील सोमनाथ शिंदे यांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वैष्णवी थोरात यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.