सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील शंकरनगर येथून सुमारे अडीच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा जितेंद्र गुड्डू कुमार सिंग (वय ५ वर्षे १० महिने) याचा मृतदेह अखेर जंगल परिसरात सांगाड्याच्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शंकरनगर परिसरालगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीस मानवी सांगाडा आढळून आला. त्याने तात्काळ ही बाब परिसरातील नागरिकांना कळविली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर सिन्नर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी संबंधित कुटुंबीयांसह शहानिशा केली असता, घटनास्थळी आढळून आलेल्या कपड्यांवरून हा सांगाडा बेपत्ता असलेल्या जितेंद्र गुड्डू कुमार सिंग याचाच असल्याची प्राथमिक ओळख पटली आहे. या प्रकरणी मुलाचे वडील गुड्डू कुमार दुबारी सिंग (वय २५, सध्या रा. शंकरनगर, सिन्नर; मूळ रा. मोहगळी, उत्तर प्रदेश) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास जितेंद्र हा शंकरनगर परिसरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र तो आढळून न आल्याने पोलिस ठाण्यात बालक अपहरणाची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब पथकाची मदत घेण्याचे आदेश दिले असून सांगाड्याची वैज्ञानिक तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार एखाद्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात या बालकाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सर्व शक्यता लक्षात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, “फॉरेन्सिक अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. कोणतीही बाब दुर्लक्षित न करता तपास सुरू आहे, असेही ते म्हणाले.