Agriculture  Pudhari
नाशिक

Nashik Agriculture | सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाल्याची क्रांती

Nashik Agriculture | सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाल्याची क्रांती; तीन गावांतील ५६ शेतकरी आधुनिक शेतीकडे; नाविन्यपूर्ण पिकांच्या क्षेत्रवाढीस चालना

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेतीशाळा व पीक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे तालुक्यात नाविन्यपूर्ण शेतीची नवी दिशा निर्माण झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण आणि बाजारपेठेचा अभ्यास यांच्या बळावर शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच अधिक नफा देणाऱ्या विदेशी भाजीपाल्याच्या लागवडीकडे वळत असून, सिन्नर तालुका विदेशी भाजीपाला उत्पादनाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पुढे येत आहे.

'आत्मा' योजनेअंतर्गत लोणारवाडी, जोगलटेंभी आणि कासारवाडी या गावांमध्ये विदेशी भाजीपाला शेतीशाळा व प्रात्यक्षिके घेण्यात आली. या उपक्रमात लोणारवाडी २०, जोगलटेंभी ६, कासारवाडीतील ३० शेतकरी अशा एकूण ५६ शेतकऱ्यांनी सहभाग घेत प्रत्यक्ष शेतावर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार व अनिल दातीर, उपकृषी अधिकारी रणजित आंधळे, बाळासाहेब देठे, बाबासाहेब जोशी, सहायक कृषी अधिकारी योगिता घोरपडे, दिव्या भोर, चेतन नागरे तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोकुळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.

'आत्मा'कडून प्रशिक्षण

बॅझिल, ब्रोकोली, लाल (चायना) कोबी, चिनी पालक, आईसबर्ग लेट्युस या पिकांची निवड, दर्जेदार रोपे, संतुलित खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, मल्चिंग, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, काढणीनंतरची हाताळणी तसेच बाजारपेठेचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

"सिन्नर तालुक्यात ठाणगाव व वडगाव परिसरानंतर आता लोणारवाडी, जोगलटेंभी, कासारवाडीसह इतर भागांतील शेतकरीही विदेशी भाजीपाला शेतीकडे वळत आहे. योग्य तांत्रिक मार्गदर्शन, आधुनिक शेती पद्धती आणि नियोजनातून चांगले उत्पादन व अधिक नफा मिळू शकतो."
— ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी
"विदेशी भाजीपाला पिकांची लागवड केल्यामुळे कमी जागेत, कमी कालावधीत चांगले उत्पादन व उत्पन्न मिळत आहे. या पिकांना बाजारात चांगली मागणी व समाधानकारक दर मिळत आहे."
— बाळू जेजुरकर, शेतकरी, जोगलटेंभी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT